संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज ; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार..?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि त्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
राज्यात किमान ५ ऑक्टोबरपर्यंत तरी मान्सून निरोप घेण्याची शक्यता नाही, असे सांगितले जात आहे.
दि. २६ सप्टेंबर रोजी दक्षिण विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यात दुपारनंतर ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होऊ शकते. यात गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरित विदर्भ आणि मराठवाड्यात आभाळी हवामान आणि हलका पाऊस पडू शकतो, असे म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढण्याऱ्या पावसाने बुधवारी काहीसा दिलासा दिला असला तरी अनेक भागांमध्ये पूरस्थिती कायम आहे. अजूनही अनेक गावांना पुराचा वेढा असून पिकांसह घरांमध्ये पाणी साचलेले आहे. त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले आहे.
नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही
शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. दक्षिण मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरातील धरण साठ्यात वाढ होऊन नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, महापुरामुळे अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकरी आणि लोकांना धीर देण्यासाठी सरकारच शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील उजनी, औराद शहाजानी, सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील निमगाव तसेच दारफळ सीना येथे नुकसानाची पाहणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माढा तालुक्यात तर एकनाथ शिंदे यांनी भूम परांडा भागात आपत्तीग्रस्तांची भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले. विरोधी पक्षांचे नेतेही शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. नुकसानीची पाहणी केली.