गेल्या 11 वर्षांत देशातील 25 कोटी नागरिकांची गरिबीवर मात; पंतप्रधान मोदींचा दावा….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात GSTमध्ये मोठे बदल होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार मोदी सरकारने पाऊले उचलत 21 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या मंत्रिगटाच्या बैठकीत जीएसटीचे 12 टक्के आणि 28 टक्क्यांचे दोन स्लॅब रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानंतर 3 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत पार पडलेल्या जीएसटी परिषदेच्या 56 व्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 22 सप्टेंबर 2025 पासून हे बदल लागू होणार असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, आता नवरात्रीच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी मोठा दावा केला आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या 11 वर्षांत देशातील 25 कोटी नागरिकांनी गरिबीवर मात केली आहे. नागरिकांनी फक्त गरिबीवर मात केली नाही, तर गरिबीतून बाहेर पडून एक मोठा गट मध्यमवर्ग म्हणून मोठी भूमिका बजावत आहे. या वर्गाची स्वतःची महत्त्वाकांक्षा आणि स्वप्ने आहेत. या वर्षी सरकारने 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. 12 लाख रुपयांपर्यंतच्या पगारावरील कर शून्य झाल्यामुळे मध्यमवर्गाला मोठा फायदा होत आहे. तसेच जीएसटी कमी झाल्यामुळे देशातील नागरिकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, घर बांधणे, स्कूटर किंवा कार खरेदी करणे, या सर्वांसाठी आता नागरिकांना कमी खर्च लागणार आहे. तसेच प्रवास देखील स्वस्त होईल, कारण हॉटेलच्या खोल्यांवरही जीएसटी कमी करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे जीएसटी सुधारणांमुळे दुकानदार उत्साही आहेत. त्यामुळे आता आपण ‘नागरिक देवो भवः’ या मंत्राने पुढे जात आहोत. जर आपण “आयकर सूट आणि जीएसटी सूट” एकत्र केली तर एका वर्षात घेतलेल्या निर्णयांमुळे देशातील लोकांचे ₹2.5 लाख कोटींपेक्षा जास्त बचत होईल. म्हणूनच, हा बचतीचा उत्सव आपण साजरा करत आहोत, असे त्यांनी सांगितले.