सार्वजनिक वाहतूक आणि माल वाहतूक वार्षिक कर भरणाऱ्या वाहनांना करमाफी
परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या लॉकडाउनमुळे सार्वजनिक वाहतूक आणि माल वाहतूक वार्षिक कर भरणाऱ्या वाहनांना १ एप्रिल २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत वाहन करमाफी देण्याबाबतचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी दिली.
कोविड -१९ पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने २५ मार्च २०२० पासून संपूर्ण देशात लॉकडाउन घोषित केला होती. हा लॉकडाउन ३१ मे २०२० पर्यंत सुरू होता. त्यानंतर राज्य शासनाने ३१ मे २०२० च्या आदेशान्वये मिशन बिगिन अगेन अंतर्गत काही प्रमाणात लॉकडाउन खुला केला आहे. या लॉकडाउनच्या कालावधीत सार्वजनिक वाहतूक बंद होती. त्यामुळे विविध वाहतूक संघटनांनी नुकसान भरपाई म्हणून शासनाने करमाफी द्यावी, अशी विनंती केली होती. यासंदर्भात आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.
‘या’ वाहनांसाठी राहणार करमाफी
राज्यामध्ये वार्षिक कर प्रणालीच्या वाहनांना १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२० या सहा महिन्यांच्या कालावधीत कर भरण्यापासून १०० टक्के करमाफी देण्याचा म्हणजे सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी एकूण वार्षिक कराच्या ५० टक्के करमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही करमाफी मालवाहतूक करणारी वाहने, पर्यटक वाहने, खोदकाम करणारी वाहने, खाजगी सेवा वाहने, व्यावसायिक कॅम्पर्स वाहने, स्कूल बसेस या वार्षिक कर भरणाऱ्या वाहनांना लागू राहणार आहे.
या सर्व कर भरणाऱ्या वाहनांची एकूण संख्या ११ लाख ४० हजार ६४१ एवढी आहे. त्यामुळे राज्य शासनास सुमारे ७०० कोटी एवढा कर कमी मिळणार असल्याने राज्य शासनावर तेवढा आर्थिक बोजा पडणार असल्याचे परब यांनी सांगितले.