ग्रामसेवक अश्विन तांबडे यांचा सन्मान ; कर भरण्याचे व लोकविकासात सहभागी होण्याचे आवाहन….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- “राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ यांच्या वतीने नुकतेच राष्ट्रीय लोकअदालताचे भव्य आयोजन पार पडले. या कार्यक्रमात ग्रामपातळीवरील विविध प्रकरणांच्या यशस्वी निपटाऱ्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल ग्रामसेवक अश्विन तांबडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा व जिल्हा न्यायाधीश क्रमांक एक श्रीमती रामगडिया मॅडम, पोलीस प्रशासन व मान्यवर उपस्थित होते. सन्मानानंतर ग्रामसेवक तांबडे यांनी नागरिकांना प्रबोधनपर आवाहन केले.
ग्रामसेवक तांबडे म्हणाले की,
> “लोकन्यायालय हे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणारे सुलभ व उपयुक्त व्यासपीठ आहे. येथे प्रकरणे जलद, कमी खर्चात व मैत्रीपूर्ण मार्गाने निकाली निघतात. त्यामुळे नागरिकांनी आपल्या वादग्रस्त प्रकरणांसाठी लोकन्यायालयाचा अवलंब करावा.”
तसेच त्यांनी पुढे सांगितले की,
> गावोगावी विकासकामांसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी नागरिकांनी वेळेवर कर भरणे आवश्यक आहे. कर भरणे ही फक्त कायदेशीर जबाबदारी नसून गावाच्या सर्वांगीण प्रगतीतला थेट सहभाग आहे. शाळा, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य केंद्रे या सुविधांसाठी कराच्या रकमेचा वापर होतो. म्हणूनच प्रत्येक नागरिकाने आपला हक्क बजावताना जबाबदारीही पार पाडली पाहिजे.” ही बाब गावकऱ्यांना पटवून दिल्याने आणि त्याबाबत जनजागृती केल्याने लोक न्यायालयामध्ये त्यांनी आपल्या कराचा भरणा करून प्रशासनाला नव्हे तर स्वतःसह गावच्या विकासाला हातभार लावण्यासाठी यशस्वी पाऊल उचलले असल्याबाबत त्यांना धन्यवाद व्यक्त केला
ग्रामसेवक तांबडे यांचे प्रयत्न आणि नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळे गावोगाव लोकजागृती व विकासाचा संदेश अधिक बळकट होत असल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.
ग्रामसेवक अश्विन तांबडे यांच्या यशोगाथेमुळे न्यायाधीश पोलीस प्रशासन वकील मंडळी या सोबतच नागरिक तथा पंचायत समितीचे अधिकारी व इतर ग्राम पंचायत चे सरपंच उपसरपंच सदस्यांसह इतरही ग्रामसेवकांनी त्यांचा यथोचित सत्कार सन्मान व अभिनंदन केले आहे