अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या एक दिवस आधी पृथ्वीवर आदळणार लघुग्रह ?; ‘ नासा’ने कैला खुलासा
नासाने यासंदर्भात एक महत्वपूर्ण खुलासा केलाय
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमेरिकेत ३ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये दोन्ही प्रमुख पक्षांची आपल्या उमेदवारांची घोषणा केली असून निवडणुकीच्या तयारीला वेग आल्याचे चित्र दिसत आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच सोशल मिडियाबरोबरच प्रसारमाध्यमांनाही या निवडणुकांच्या एक दिवस आधी म्हणजेच २ नोव्हेंबर रोजी एक छोट्या आकाराचा लघुग्रह (अॅस्टेरॉईड) पृथ्वीला धडकणार असल्याची बातमी दिली होती. मात्र आता या बातमीसंदर्भात अमेरिकेमधील अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाने अधिकृत स्पष्टीकरण दिलं आहे.
नासाने हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे म्हटले आहे. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुत्वाकर्षण आणि इतर भौगोलिक गोष्टींचा विचार करता हा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तरी त्यामुळे फारसे नुकसान होणार नसल्याचे नासाने म्हटलं आहे. नासाने ट्विटवरुनही याबद्दल माहिती दिली आहे. या लघुग्रहाचे नाव २०१८व्हीपी वन असं आहे. हा आकाराने खूपच छोटा आहे. या लघुग्रहाचा आकार साडेसहा फूट इतका आहे. यामुळे पृथ्वीला कोणताही धोका नाहीय. हा लघुग्रह पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करण्याची शक्यता केवळ ०.४१ टक्के इतकी आहे. तसेच तो पृथ्वीच्या वातावरणात दाखल झाला तर त्यापासून धोका पोहचण्याची शक्यात अगदीच नगण्य आहे. हा लघुग्रह आकाराने खूपच लहान असल्याने तौो पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश केल्यानंतर घर्षणामुळे जळून खाक होईल असं नासाने म्हटलं आहे.
२०१८व्हीपी वन हा लघुग्रह अपोलो लघुग्रहांच्या प्रकारामध्ये मोडतो असं नासाने सांगितलं आहे. हे लघुग्रह आकाराने खूपच लहान असतात आणि त्यांच्यापासून अजिबातच धोका नसतो. पृथ्वीच्या जवळपास अंतराळामध्ये असणारे हे असे लघुग्रह असतात ज्यांची भ्रमण कक्षा ही खूप मोठी असते. मात्र नंतर ते पृत्वीच्या कक्षेत येतात. अशाप्रकारचा पहिला लघुग्रह १८६२ साली शोधण्यात आला होता. अशाप्रकारे पृथ्वीच्या वातावरणामध्ये अंतराळामधून रोज शेकडो टन धूळ पडते असंही नासाने म्हटलं आहे. २०१८व्हीपी वनच्या आकाराऐवढे लघुग्रह पृथ्वीला काहीच नुकसान पोहचवू शकत नाहीत. असं असलं तरी नासाच्या सॅट्री रिस्क टेबलमध्ये अशाप्रकारच्या अगदी लहान लघुग्रहांवर नजर ठेवली जाते. अशा लघुग्रहांपासून भविष्यात काय धोका असू शकतो याचा अंदाज व्यक्त करण्यासाठी या लघुग्रहांच्या हलचालींवरही लक्ष ठेवलं जातं.
यापूर्वीही अशाप्रकारचे अनेक लहान लघुग्रह पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश केल्यानंतर जळून खाक झाले आहेत, असं नासाने स्पष्ट केलं आहे. २०१८ साली २०१८व्हीपी वन हा लघुग्रह कॅलिफोर्नियामधील पालोमर निरिक्षण केंद्रामधून शोधण्यात आला होता. या लघुग्रहाच्या छोट्या आकारामुळे त्याचा पोटेंशियली हजार्डस अॅस्टेरॉईड म्हणजेच पृथ्वीच्या दृष्टीने “संभाव्य धोकादायक” ठरणाऱ्या लघुग्रहांमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. आतापर्यंत अंतराळामध्ये पृथ्वीच्या आजूबाजूच्या भागामध्ये १४० मीटरपेक्षा अधिक मोठा व्यास असणारे आठ हजारहून अधिक लघुग्रह आढळून आले आहेत. हे सर्व लघुग्रह ७ दशलक्ष किमीपर्यंतच्या परिघामध्ये आढळून आले आहेत. नासाच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व खगोलीय वस्तूंचे वर्गीकरण हे पृथ्वीच्या दृष्टीने “संभाव्य धोकादायक” ठरणाऱ्या अंतराळातील वस्तूंमध्ये करण्यात आलं आहे.