जिल्हाधिका-यांची महागाव येथील कोव्हीड केअर सेंटरला भेट व रुग्णांशी संवाद ; महागाव , उमरखेड व आर्णि तालुक्याचा आढावा
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 25 :
कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी महागाव येथील कोव्हीड केअर सेंटरला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. तसेच येथे भरती असलेल्या रुग्णांची आस्थेवाईपणे विचारपूस करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, यवतमाळचे उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, उमरखेडचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनीस, जिल्हा शल्य चिकत्सिक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण आदी उपस्थित होते.
महागाव, आर्णि आणि उमरखेड येथील तालुकास्तरीय यंत्रणेला मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी म्हणाले, पुढील एक महिना अतिशय महत्वाचा असून कोरोना संसर्गाच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येक गावातील को-मॉरबीड (मधुमेह, रक्तदाब व इतर आजारांनी व्याधीग्रस्त असलेले) असलेल्या नागरिकांची ग्रामस्तरीय समितीमार्फत नियमित आरोग्य तपासणी करावी. तसेच प्रत्येक गावात सारी व आयएलआय सारखी लक्षणे असलेल्या नागरिकांची तपासणी करून याबाबत आरोग्य यंत्रणेला त्वरीत माहिती द्यावी. तपासणीकरीता जास्तीत जास्त नमुने पाठवावे. नागरिकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. नागरिकांनीही काही लक्षणे असल्यास कोणताही वेळ वाया न घालविता आरोग्य यंत्रणेशी किंवा ग्रामस्तरीय समितीशी संपर्क करावा. जेणेकरून वेळेत उपचार करण्यास मदत होईल, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हाधिका-यांनी आरटीपीसीआर, रॅपीड ॲन्टीजन टेस्ट, अतिजोखीम व्यक्ती नमुने तपासणी, कमी जोखीम व्यक्ती नमुने तपासणी, ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण, तीनही तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्र आदींचा आढावा घेतला.
बैठकीला महागाव, आर्णि आणि उमरखेड तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, न.प. मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.
०००००००