मराठा समाजाला आरक्षण देणारच! काय करायचे ते…. ; मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर केलेल्या उपोषणाचा पाचव्या दिवशी शेवट झाला. सरकारने त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करत जीआर काढला.
मात्र, या काळात संपूर्ण मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी झाली. विशेष म्हणजे, न्यायालयाने हे उपोषण बेकायदेशीर (Maratha Rservation) असल्याचं स्पष्ट केलं होतं.
ओबीसी समाज आक्रमक
सरकारच्या जीआरनंतर आता राज्यात ओबीसी समाज आक्रमक झालेला दिसतो. मंत्री छगन भुजबळ यांनी (Chhangan Bhujbal) याबाबत नाराजी व्यक्त करत थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीस गैरहजर राहण्याचा मार्ग अवलंबला. त्यानंतर सरकारकडून ओबीसी आरक्षणावर विचार करण्यासाठी उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. नागपूरमध्ये ओबीसी बांधवांकडून उपोषण सुरू असून, त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्यक्ष जाणार असल्याची माहिती आहे.
मराठा समाजाला आरक्षण देणारच
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी या घडामोडींवर मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, कोणी काहीही केलं तरी माझ्या मराठा समाजाला मी आरक्षण देणारच. हे आरक्षण माझ्या गरीब मराठ्यांना हक्काचं आहे आणि ओबीसींमध्ये त्यांना मीच समाविष्ट करणार. सरकारने उपसमिती केली हे ठीक आहे, पण त्या समित्यांमुळे आमच्या समाजाचं आरक्षण थांबणार नाही. आम्हाला आरक्षण मिळणारच.
कार्यकर्ते संपवणारे नेते
भुजबळांवर टीका करताना जरांगे म्हणाले, भुजबळ हे पक्ष संपवणारे आणि कार्यकर्ते संपवणारे नेते आहेत. जीआरबद्दल आज संभ्रम निर्माण करणारे लोक आधी कुठे होते? बैठकांना बोलावलं तर येत नाहीत, मुंबईत बोलवलं तर हजर राहत नाहीत. मराठा समाजात कुठलाही संभ्रम नाही आणि होणारही नाही. मी त्यांच्या लेकरांसाठी जितका लढतो, तितका कोणी लढणार नाही.
नाहीतर पुन्हा रस्त्यावर आंदोलन
मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला. थोड्याच दिवसांत हे आरक्षण प्रत्यक्षात दिसेल. मराठ्यांनी संभ्रम करून घेऊ नका. सातारा गॅझेटबाबत सरकारने हायगाई करू नये. नाहीतर पुन्हा रस्त्यावर आंदोलन छेडेन. काही चुकलं तर मी आहे ना,” अशा शब्दांत त्यांनी सरकारला थेट इशारा दिला.