विदर्भ – मराठवाडा सिमेवरील धनोडा येथील पोलीस चौकी बनली वाहन धारकांसाठी आर्थिक लुटमारीचे केंद्र

स्थानिक हॉटेल चालक बनला आर्थिक देवाण घेवाणीचा मिडियटर, हरीश कामारकर यांची एस, पी, कडे तक्रार
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाच्या सूचनेवरून पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व जिल्ह्यांच्या सीमेवर पोलीस चौकी निर्माण करण्यात आल्या आहेत. या मध्ये विदर्भ व मराठवाड्याच्या सिमेवर महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धनोडा येथे पोलिस चौकी उभारण्यात आली जेणेकरून कोरोना विषाणू प्रादुर्भावावर उपाययोजना म्हणून इतर जिल्ह्यातील नागरिक ये – जा थांबविण्यात येईल, परंतु ही चौकी निदर्शीत कामांना बगल देत वाहन धारकांचे आर्थिक लूट मार केंद्र बनल्याचे समोर आल्याने, या संदर्भात तालुक्यातील हिवरा( सं.) येथील सामाजिक कार्यकर्ते हरीश कामारकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या कडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यातील धनोडा नजीक पैनगंगा नदी ही विदर्भ – मराठवाड्याची सिमा आहे. नदीच्या पलीकडून नांदेड जिल्हयाचा माहूर तालुका लागूनच आहे. मध्यंतरीच्या काळात माहूर तालुका कोरोनाच्या बाबतीत हायरिस्क झाला होता, त्यानंतर माहूर कडून येणारी सर्व आवक पूर्णपणे बंद करण्यात आली. परंतु पुढे पुढे ही निर्बंधता थोड्याफार प्रमाणात शिथिल करण्यात आली, यामुळे अत्यावश्यक सेवा, कृषी संलग्नित व्यवहार व माहूर येथील शासकीय दवाखान्यामुळे लोकांची ये – जा वाढली याच संधीचा फायदा घेत येथील कर्तव्यावर असलेला विनायक चव्हाण नामक पोलीस कर्मचारी आपली आर्थिक पोळी भाजण्याचे काम करत असल्याचे निदर्शनास आले. संबंधित चव्हाण नामक पोलीस कर्मचारी हे येथील एका स्थानिक हॉटेल चालकाला हाताशी धरून हे सर्व आर्थिक चिरीमिरीचा प्रपंच चालवीत असल्याचे या निवेदनातून म्हंटले आहे. सदर कर्मचारी हे तेलंगणा मधुन होत असलेली अवैध गुटखा वाहतुक,जनावरांची तस्करी, अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या वाहनांना न तपासता राजरोसपणे जिल्ह्यात प्रवेश देतो, यातून त्यांना महिन्या काठी लाखो रुपयांचे उत्पन्न ही असल्याचे बोलले जाते. हे सर्व एकीकडे असतांना मात्र सामान्य नागरिक यात प्रामुख्याने माहुर येथे उपचारासाठी रुग्णालयात जाणारे रुग्ण, मराठवाड्यात शेती असलेले शेतकरी व अत्यावश्यक सेवेत किंवा अत्यावश्यक कामासाठी जाणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांना मात्र विनाकारण अडवुन त्यांना धाक दपट करून कारवाई करण्याची धमकी देऊन हॉटेल चालकामार्फत अप्रत्यक्ष रित्या वाहन धारकांशी बोलणी करून आर्थिक देवाण घेवाण केल्या जाते. असा सर्व प्रकार राजरोसपणे चालु असुन या बद्दल अनेक वाहनधारकांनी महागाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांच्याकडे तक्रार केली परंतु त्यावर कोणतीच कारवाई केली जात नसल्याने या पोलीस कर्मचाऱ्याला महागाव ठाणेदारांचे सुद्धा पाठबळ असल्याची शक्यता नाकारताना येत नाही. त्यामुळे कोरोना काळात सीमा भागात उभारलेली ही पोलीस चौकी केवळ पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांचे आर्थिक उलढालीचे केंद्र बनले आहे. त्यामुळे याकडे लक्ष घालुन या ठिकाणी सर्वसामान्य वाहनधारकांची होणारी लुट थांबवून संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करा अशी मागणी हरीश कामारकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीतुन केली आहे.
स्थानिक हॉटल चालक बनला मिडियटर :
याठिकाणी असलेला हॉटेल चालक आलेल्या वाहन धारकांना अडविल्यानंतर त्यांना बाजुला नेवुन जर पोलीस कारवाई करावयाची नसल्यास साहेबांना काही रक्कम द्यावी लागेल मी साहेबांना बोलतो त्यानंतर कारवाई पासुन वाचविण्यासाठी वाहन धारकांकडुन ठरलेली रक्कम घेतल्यानंतर आपल्या हिस्स्याची रक्कम घेवुन उरलेली रक्कम या पोलीस कर्मचाऱ्याला देत असल्याची माहिती आहे.