आझाद मैदानावर तुफान गोंधळ, सुप्रिया सुळे यांची गाडी अडवली, घेराव घातला, आंदोलक आक्रमक…

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आल्या. पण मनोज जरांगे यांची भेट घेऊन परतत असताना मराठा आंदोलक आक्रमक झाले.
मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना घेराव घातला. सुप्रिया सुळे कशातरी गाडीत बसल्या. पण त्यानंतर आंदोलकांनी प्रचंड गोंधळ घातला. आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांची गाडी अडवली. आंदोलकांनी काही वेळ गोंधळ घातला. सुदैवाने यावेळी काही मराठा आंदोलकांनी गाडी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. पण बरेच मराठा आंदोलक हे गाडी अडवण्यासाठी पळत जाताना दिसले. यावेळी काही आंदोलकांनी शरद पवारांनी आमचं वाटोळं केलं, असं म्हटलं. तर सुप्रिया सुळे यांची गाडी पुढे निघाल्यानंतर आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर बॉटलही फेकून मारल्या.
खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आझाद मैदान येथे जात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत त्यांचं बोलणं होऊ शकलं नाही. सुप्रिया सुळे या मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी मंचावर गेल्या. पण मनोज जरांगे हे झोपलेले होते. यामुळे त्यांनी इतर मराठा समन्वकांसोबत चर्चा केली. तसेच मनोज जरांगे यांना झोपेतून जाग आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. सुप्रिया सुळे यांनी त्यांना प्रकृतीची काळजी घेण्याचं आवाहन केलं. यावेळी मनोज जरांगे यांनी मान हलवत होकार दिला. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावलेली बघायला मिळत आहे. त्यांच्यात त्राण दिसत नाहीय. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
“मी डॉक्टरांशी चर्चा केली. मनोज जरांगे यांनी चार दिवसांपासून काही खाल्लेलं नाही. त्यांना प्रचंड अशक्तपणा आलेला आहे. डॉक्टारांचं तेच म्हणणं होतं, चार दिवसांपासून शरीरात अन्न न गेल्यामुळे त्यांना प्रचंड अशक्तपणा आलेला आहे. त्यांना थकल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे ते आराम करत होते. मी त्यांना म्हणत होते की, त्यांना उठवूच नका. पण सरपंचांचा आग्रह होता त्यामुळे मी त्यांना म्हटले की, काळजी करु नका. तब्येतीची काळजी घ्या. सगळ्यांच्या जबाबदाऱ्या आहेत. त्यांचे घरचे सुद्धा काळजी करत असतील.”
“आंदोलकांचं म्हणणं होतं की, मी मुंबई महापालिकेला विनंती करावी. मी कालही महापालिकेच्या आयुक्तांशी संपर्क केला. या भागात स्वच्छतेचा मोठा प्रश्न येतोय. महाराष्ट्रातून सगळ्याच लोकांनी अन्नाचा प्रश्न सोडवलेला आहे. सगळ्यांचं म्हणणं आहे, महापालिका प्रशासनाला सांगून इथे टॉयलेच्या स्वच्छतेबाबत, तसेच मैदानात चार लाईट्सची व्यवस्था व्हावी. स्वच्छतेची मागणीदेखील सर्वात महत्त्वाची आहे. इथे प्रचंड अस्वच्छता आहे. त्यामुळे मी प्रशासनाला विनंती करणार आहे, असी प्रतिक्रिया सुप्रिय सुळे यांनी दिली.”
“आंदोलकांचं म्हणणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याची आमची सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. माझी हात जोडून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनम्रपणे विनंती आहे. सगळ्या पक्षांना बोलवा. तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवा. त्यानंतर लगेच एक दिवसाचं अधिवेशन बोलवा आणि हा निर्णय मार्गी लावा. सरकारला करायचं असेल तर काही अवघड नाही. सगळेचं लोकं इथे भेटायला येत आहे. कुणाचाच विरोध नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी आणि आरक्षणाचा निर्णय पास करुन टाकावा.”