मनोज जरांगे पाटलांच्या बैठकीसाठी एवढे पैसे कोण देतं…? लक्ष्मण हाकेंच्या आरोपांनी खळबळ, केला मोठा दावा….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मोठं आंदोलन उभारलं, त्यांनी आरक्षणासाठी अनेकदा उपोषण देखील केली. दरम्यान आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आहे, येत्या 29 ऑगस्टला मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे.
हा मोर्चा गेल्या मोर्चापेक्षा पाचपट मोठा असेल असा इशारा देखील जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आला आहे.
दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे गावा गावांमध्ये जाऊन मराठा बांधवांच्या भेटी घेत आहेत. गावागावत बैठका होत आहेत. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. आरोप-प्रत्यारोपाला वेग आला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. जरांगे पाटील यांच्या या बैठका सरकार पुरस्कृत असल्याचं हाके यांनी म्हटलं आहे. दरम्यान यामुळे आता नव्या वाद्याला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले हाके?
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज बीड जिल्ह्यातल्या मांजरसुंभ्यात एक निर्णय बैठक होत आहे. या बैठकीवरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत. जरांगेंच्या या बैठकीसह इतर बैठका या सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप हाके यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, ही राज्यकर्ते पुरस्कृत झुंडशाही आहे, जरांगेंना या बैठकांसाठी एका मतदारसंघातून आमदार 10 ते 15 लाख रुपये देतात, असा आरोपही हाके यांनी केला आहे.
यामुळेच मराठवाड्यातल्या छोट्या छोट्या गावातही मोठमोठी बॅनर्स आणि पोस्टर्स लागले आहेत. ओबीसीमध्ये आरक्षण घेऊन मराठा समाजाला व्यवस्था हातात घ्यायची आहे. आरक्षणाच्या माध्यमातून नोकरशाहीमध्ये आपली लोक घुसवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासंदर्भात महाराष्ट्रातील कोणत्याच नेतृत्वाकडून आता अपेक्षा नाही. त्यामुळे यासंदर्भात केंद्रातील ओबीसी नेत्यांना साकडे घालणार आहोत असंही यावेळी हाके म्हणाले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींवर हाकेंनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. मिटकरी हे फार मोठे व्यक्ती नाहीत, असं हाकेंनी यावेळी म्हटलं आहे.