लवकर सुधारणा करा..! मुख्यमंत्र्यांची नगर विकास खात्याच्या कामावर नाराजी, फडणवीस अन् शिंदे यांच्यात ऑल इज नॉट वेल..?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या नगर विकास खात्याबाबत नाराजी व्यक्त केलीय. नगरविकास खात्याचा कारभार सुमार असून अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर सुधारणा कराव्या अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्यात.
केंद्र सरकारच्या योजनांबाबत पुनरावलोकन करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नगर विकास विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
नगर विकास खात्याकडून केंद्र सरकारच्या योजना राबवण्यात ढिसाळ कामगिरी झाल्याचं मत फडणवीस यांनी व्यक्त केलंय. फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्यानं आता पुन्हा एकदा शिंदे आणि फडणवीस यांच्यात ऑल इज नॉट वेल अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात शुक्रवारी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला. मात्र या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीची चर्चाही रंगली होती.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत सांगिलं की, केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी आपल्याला व्यवस्थित करायचीय. आतापर्यंत झालेल्या कामगिरीचा आढावासुद्धा मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यात नगरविकास खात्याकडून AMRUT 2.0 या योजनेची अंमलबजावणी व्यवस्थित झाली नसल्याचं फडणीस म्हणाले.
अमृत म्हणजेच अटल मिशन रिज्युवेननेशन अँड अर्बन ट्रान्सफर्मेशन या योजनेचा दुसरा टप्पा आहे. हा टप्पा २०२१ ते २०२६ या कालावधीसाठी आहे. योजनेंतर्गत आतापर्यंतच्या कामगिरीत नगरविकास खात्याकडून कामचुकारपणा झाल्यानं यावर फडणवीस यांनी थेट नाराजी व्यक्त केलीय.
अमृत योजनेच्या अंतर्गत पाणीपुरवठा, स्वच्छता, ग्रीन पार्क, शहरीकरणातला विकास यासाठी केंद्र सरकारने निधी दिलाय. त्याचा वापर कशा प्रकारे गेला गेला असा प्रश्न फडणवीस यांनी बैठकीत विचारला. कंत्राट ज्यांना दिलंय त्यांच्याकडून कामं मुदतीच्या आत करून घेण्याच्या सूचनासुद्धा फडणीस यांनी दिल्या.