विदर्भात मुसळधार पावसाचा कहर!धरणांचे दरवाजे उघडले,पूराच्या पाण्यात जनजीवन ठप्प,कुठे काय परिस्थिती..?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “विदर्भात रविवारी सकाळपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. बुलढाणा, अकोला, जळगाव, वाशिम, चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी झाल्याने नद्या-नाले धोक्याच्या पातळीवर पोहोचले आहेत.
धरणांचे दरवाजे उघडावे लागले असून, शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून, अनेक घरांना व दुकांनांना पाण्याचा फटका बसला आहे.
बुलढाणा जिल्हा
बुलढाण्यातील मेहकर, चिखली, सिंदखेड राजा तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला. नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले. चिखली तालुक्यातील शेलगाव आटोळ येथे एक युवक पुराच्या पाण्यात वाहून गेला; त्याचा मृतदेह चार तासानंतर सापडला. जिल्ह्यात शेकडो हेक्टर शेती जलमय झाली आहे. बुलढाणा-चिखली, नागपूर-मुंबई, खामगाव-मेहकर यांसह अनेक महामार्ग बंद झाले आहेत. ग्रामीण भागात घरांमध्ये पाणी शिरून पडझड झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
अकोला जिल्हा
अकोल्यात मुसळधार पावसामुळे काटेपूर्णा प्रकल्पाचे सर्व 10 दरवाजे ६० सें.मी.ने उघडण्यात आले असून ४८० क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तर पारस औष्णिक विद्युत केंद्रासाठी बनवलेल्या बाळापूर प्रकल्पाचे १० दरवाजे उघडण्यात आले आहेत. परिणामी बाळापूर शहराचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. मन आणि महेशा नदीकाठच्या भागांत पाणी शिरल्याने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
जळगाव जिल्हा
जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे धबधबे पर्यटनाचे केंद्र ठरत आहेत. अजिंठा लेणी परिसरातील सप्तकुंड धबधबा आणि यावल तालुक्यातील मनू देवी धबधबा मोठ्या धबधक्यासह वाहू लागले आहेत. मात्र, रावेर-अजनदा जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक रोखण्यात आली आहे. सकाळपासून पाऊस थांबल्याने पूर ओसरला असला तरी ,नाल्याच्या पुराने अनेक शेतात आणि घरात पाणी शिरल्याने पिकांचे आणि घरांचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले,काही ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या आहेत तर बक्षी पुरा गावात वादळी पावसात सहा बकऱ्या मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे
चंद्रपूर जिल्हा
चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस झाला नसला तरी पश्चिम विदर्भातील मुसळधार पावसामुळे वर्धा नदीला मोठा पूर आला आहे. ईसापुर आणि सातनाला धरणांतून मोठा विसर्ग सुरू झाल्याने वर्धा, पैनगंगा, इरई आणि झटपट नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे चंद्रपूर-हडस्ती आणि चोरगाव रस्ते बंद करण्यात आले आहेत. मात्र, इरई धरणातून पाणी सोडलेले नसल्याने शहराला पुराचा धोका आत्तापर्यंत टळला आहे.
वाशिम जिल्हा
वाशिमच्या नेतन्सा परिसरात थरारक घटना घडली. नमहादेव मंदिर दर्शनाला गेलेल्या 8 युवकांना कांचनदीच्या पुराने वेढा घातला. हे युवक जवळपास पाच तास पाण्यात अडकले होते. अखेर धाडसाने एका युवकाने बाहेर पडून थरारक सुटका केली. प्रशासनाकडून मदत पोहोचण्यास विलंब झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अमरावती-यवतमाळ जिल्ह्यात गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे इसापूर धरणाचा विसर्ग सुरू आहे. या धरणाचे पाणी पैनगंगा नदीतून वर्धा नदीत आल्याने वर्धा, इरई आणि झरपट नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
प्रशासनाचा इशारा
राज्यातील अनेक भागात अजूनही मुसळधार पाऊस सुरू असून नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. धोक्याची पातळी ओलांडलेल्या नद्यांच्या काठावर नागरिकांनी जाणे टाळावे तसेच नदीपात्र ओलांडू नये, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.