विधानसभेपूर्वी 160 जागा जिंकून देण्याची ऑफर, शरद पवारांच्या सनसनाटी दाव्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना एक मोठा गौप्यस्फोट केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन व्यक्तींनी त्यांची भेट घेतली होती आणि 160 जागा जिंकून देण्याची हमी दिली होती.
मात्र, निवडणूक आयोगावर कोणतीही शंका नसल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. तसेच, त्या दोघांची भेट राहुल गांधी यांच्यासोबतही घालून देण्यात आली होती. मात्र आम्ही दोघांनीही लोकांमध्ये जाऊन जो निर्णय जनतेचा असेल तो मान्य करण्याचे ठरवले आणि त्या व्यक्तींनी दिलेल्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले, असे देखील शरद पवार यांनी म्हटले. आता शरद पवारांच्या सनसनाटी दाव्यावर भाजपची (BJP) पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, अत्यंत बालिश आणि हास्यास्पद असे दावे आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे. पवार साहेबांसारख्या एका ज्येष्ठ नेत्याने अशा प्रकारचे दावे करणे हे खरंच आश्चर्यकारक आहे. जर आपल्याकडे अशा प्रकारची दोन माणसं आली होती तर तुम्ही तत्काळ पोलीस स्टेशनला किंवा संबंधित यंत्रणांना तक्रार का केली नाही? उलट आपण त्या लोकांना घेऊन राहुल गांधी यांच्याकडे गेला. याचा अर्थ तुमचा उद्देश राहुल गांधींशी चर्चा करून अशा गोष्टींना समर्थन देण्याचा विचार होता का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्या दोन व्यक्तींची चौकशी व्हावी
राहुल गांधी यांची काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी हे अत्यंत विचलित झालेले आहेत. त्या हतबलतेतून अशा प्रकारच्या गोष्टी पुढे येत आहेत? लोकसभेला निकाल तुमच्या बाजूने लागला, त्यावेळेला आम्ही म्हणायचे का की अशाच प्रकारच्या कुठल्या गोष्टींचा आपण आधार घेतला. विधानसभेला आपल्याला शक्य झाले नाही. हे त्यांचे वक्तव्य कुणालाही पटणारे नाही. ज्यावेळी तुमच्याकडे माणसे आले तुम्ही त्याच वेळेस तक्रार का दाखल केली नाही? या दोन व्यक्ती कोण आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे. तपास यंत्रणांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे, असे देखील प्रवीण दरेकर म्हणाले.
शरद पवार इतक्या उशिराने बोलल्याचे आश्चर्य
प्रवीण दरेकर पुढे म्हणाले की, हा सगळा भंपकपणा आहे. लोक इतके पण मूर्ख नाहीत. महाविकास आघाडीला आता केंद्र सरकार, राज्य सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे. ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीपुढे जात आहे, त्याचं पोटशूळ आहे. त्यातूनच अशा खळबळजनक गोष्टी काढून जनतेला काही संभ्रमित करता येतं का? असे सुरू आहे. ही घटना अत्यंत गंभीर आहे आणि शरद पवार यांच्यासारखा नेता इतक्या उशिरा बोलतोय याचे आश्चर्य वाटते, असे त्यांनी म्हटले.
नेमकं काय म्हणाले होते शरद पवार?
शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले की, मला आठवतंय की, विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला आले. दोन लोक, त्यांची नावे, पत्ते आत्ता माझ्याकडे नाहीत. मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी मला सांगितलं की, महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत, आम्ही तुम्हाला 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो. मला आश्चर्य वाटलं. स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जे जे गॅरंटीचं सांगितलं. निवडणूक आयोग या संस्थेबद्दल मला यत्किंचितही शंका नव्हती, असे लोक भेटत असतात. पण त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं. हे झाल्यानंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची भेट मी घालून दिली. त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हंटलं. राहुल गांधी आणि माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये असं झालं. हा आपला रस्ता नाही. आपण लोकांमध्ये जाऊ, लोकांचा जो निर्णय असेल तो स्विकारु, असं आम्ही ठरवल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.