माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा ; नेमकं प्रकरण काय..?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आणि कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना आज एका प्रकरणात जिल्हा न्यायालयाने एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 2014 मध्ये शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी हा निकाल देण्यात आला आहे.
ही घटना 6 डिसेंबर 2014 रोजी घडली होती. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नागपुरातील हॉटेल प्राइडमध्ये पक्षाच्या नेत्यांसोबत एक बैठक सुरू होती. हर्षवर्धन जाधव हे त्यावेळी शिवसेनेचे आमदार होते. बैठकीत जाण्यास पोलीस निरीक्षक पराग जाधव यांनी त्यांना मज्जाव केला. यामुळे संतापलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी पोलीस निरीक्षकाच्या कानशिलात लगावली होती. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणामध्ये न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंटही जारी केला होता. त्यानंतर 17 फेब्रुवारी रोजी हर्षवर्धन जाधव यांनी न्यायालयात हजर झाल्यावर त्यांना कारागृहात पाठवण्यात आले होते. याच प्रकरणाचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.
न्यायालयात शासनाच्या वतीने ॲड. चारुशीला पौनिकर यांनी बाजू मांडली, तर हर्षवर्धन जाधव यांच्या वतीने ॲड. प्रकाश जयस्वाल यांनी युक्तिवाद केला होता. हर्षवर्धन जाधव हे शिवसेनेचे माजी आमदार असून, सध्या ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटात आहेत. या निकालामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.