मालेगाव स्फोट निकालावर फडणवीसांची सर्वात छोटी पोस्ट; राजकीय वर्तुळातून काय उमटल्या प्रतिक्रिया..?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मालेगावमधील भिक्खू चौकात 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज (दि.31) मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयात जाहीर करत सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.
या निकालानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरूवात झाली आहे. या निकालावर कुणी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया.
फडणवीसांची सर्वात छोटी प्रतिक्रिया
मालेगाव स्फोटाच्या निकालावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत छोटी पण बरच अचूक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. ते त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात की, ‘दहशतवाद ना कधी भगवा होता, ना कधी राहणार’, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
शिवसेनेनं पहिल्यापासूनच निसंदिग्ध पाठिंबा दिला होता – शिंदे
फडणवीसांशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील निकालावर एक्सवर पोस्ट केली आहे. ते म्हणतात की, सत्य कधी पराभूत होत नाही : सतरा वर्षांच्या दीर्घ लढाईनंतर मालेगाव बॉम्बस्फोटातील सात कथित आरोपींची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. न्यायाला उशीर झाला हे खरं आहे, पण सत्य कधीही पराजित होत नसतं, हे पुन्हा एकवार सिध्द झालंय. मालेगावच्या स्फोटांप्रकरणी खोटे आरोप करुन तुरुंगात डांबण्यात आलेल्या देशभक्तांना शिवसेनेनं पहिल्यापासूनच निसंदिग्ध पाठिंबा दिला होता. कारण आपली बाजू न्यायाची आहे, याबद्दल शिवसेनेला कधीही संदेह नव्हता.
कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा आदी सात जणांना या आरोपामुळे प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागलाय. हा अन्याय हिंदू जनता कधीही विसरणार नाही. हिंदू कधीही देशविरोधी कृत्यं करु शकत नाही, कारण देशभक्ती हे हिंदूधर्मीयांसाठी धर्मकार्यच असतं. ‘हिंदू दहशतवाद’ नावाचा भंपक शब्द काँग्रेसी षडयंत्रकारी नेत्यांनी चलनात आणला. याच्यासारखा धादांत त्यांच्यापाशी आता काय उत्तर आहे? एक काळंकुट्ट पर्व आज संपलंय. हिंदू धर्मीयांवरचा कलंक पुसला गेलाय. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ ही घोषणा आता शंभरपट मोठ्या आवाजात देशभर दुमदुमेल, यात शंका नाही. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं! जय हिंद, जय महाराष्ट्र…
धर्माचा आणि दहशतवादाचा संबंध नाही
मालेगाव बॉम्बस्फोटानंतर देशात ‘भगवा दहशतवाद’ या शब्दाची चर्चा झाली. याप्रकरणी सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी झाली होती. मात्र भगवा आणि दहशतवादाचा काहीही संबंध नाही. धर्माचा आणि दहशतवादाचा एकमेकांशी संबंध नाही. दहशतवाद हा दहशतवाद असतो, असे स्पष्ट मत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील खरे आरोपी कोण? या प्रश्नावर याप्रकरणाच्या पुढील चौकशीतून खरे आरोपी कोण हे समोर येईल, असे अनिल देशमुख म्हणाले.
बॉम्बस्फोट झाला तर आरोपी गेले कुठे? – हर्षवर्धन सपकाळ
बॉम्बस्फोट झाला तर आरोपी गेले कुठे? हा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे. जे दोषी असतील, ते पकडले गेले पाहिजेत. यासंदर्भात सरकार काय करणार? हादेखील प्रश्न आहेच. शहीद हेमंत करकरे यांनी या प्रकरणात जे काही धागेदोरे शोधले होते, त्यांचं काय झालं? या सरकारची ही जबाबदारी आहे की या स्फोटातील आरोपींना शिक्षा व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.