‘माजाचं राजकारण, गुंडांना गंगास्नान’; उद्धव ठाकरे यांचा CM फडणवीसांवर जोरदार निशाणा….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “विधीमंडळाचं तीन आठवड्यांचं अधिवेशन आज संपत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
सरकार म्हणजे केवळ गोंधळ, सत्तेचा माज आणि लोकशाहीचा खून अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी नेहमी हसऱ्या चेहऱ्यानं वावरतो, पण रेडा कुठे कापला (Monsoon Session) नाही. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिवेशन असतं. मात्र, इथे प्रश्न विचारले गेले तरी उत्तरं मिळत नाहीत. मुख्यमंत्र्यांचं भाषण म्हणजे आईला मुलगा म्हणतो ‘आईस्क्रिम हवंय’ तसं होतं. सध्या काही नाही, पण भविष्यात काही तरी होईल असं सांगितलं जातं.
गुंडांना पक्षात घेऊन गंगास्नान
ठाकरे यांनी काल विधीमंडळात झालेल्या हाणामारीवर संताप व्यक्त करत म्हणाले, या गुंडांची एवढी हिंमत झाली कशी? कारवाईची भाषा ऐकायला चांगली आहे, पण ती हिंमत आली कुठून? हेच लोक तुरुंगात नकोत तर आमच्याकडे या असं म्हणत पक्षात घेतले जातात. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना गंगास्नान घालून पवित्र केलं जातं. भाजपने दाऊदचे साथीदार, इक्बाल मिर्ची आणि सलीम कुत्तासोबत संबंध असलेल्यांना समर्थन दिलं. हे सत्तेच्या हव्यासाचं आणि माजाचं राजकारण आहे.
राज्यावर कर्जाचा डोंगर वाढतोय. हे फेडणार कसं? कोणत्या योजना आणणार? लाडका भाऊ-बहीण योजना सांगतात, पण त्यांची ठोस उत्तरं कुठेच नाहीत, असं म्हणत ठाकरे यांनी आर्थिक कारभारावरही प्रश्न उपस्थित केले. पीक विमा रद्द केला, 3 हजार कोटींची चोरी झाली, सुप्रीम कोर्टाने पकडून दिलं, तरी चोर फिरतोय. हे म्हणजे सरकार चालत नाही, तर गोंधळ चालतोय.
राष्ट्रपती राजवट लागू करावी
विधानभवनात हाणामारी झाली, अध्यक्षांनी उच्चस्तरीय चौकशी नेमली आहे. “जर असं लोकशाहीचं अपमान विधानभवनात होतोय, तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी,” अशी मागणीही ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री मराठी नीट बोलत नाहीत. ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 वाचून दाखवत आहेत. हिंदी सक्तीवर मी त्यांना पुस्तक दिलं आहे. हिंदीबाबत अहवाल सादर झाला, कार्यगट तयार झाला पण माझं सरकार पडल्यानंतर तीन वर्ष झोपा काढल्या, असं म्हणत ठाकरे यांनी भाषाविषयक धोरणावर सरकारची कोंडी केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी काहीच निर्णय होत नाही. कर्जमाफी जाहीर केली पण तीही फसली. मी नागपूरला कोणालाही न सांगता दोन लाखांचं कर्जमाफ केलं. पण आता शेतकऱ्यांना नांगराचं जोखड खांद्यावर घ्यावं लागतंय. ही राज्यासाठी शरमेची बाब आहे. शेवटी ठाकरे म्हणाले, विरोधी पक्षनेता बहुमत असूनही दिला जात नाही. अल्पमतातलं सरकार चालवून घेतलं जातं. हे सगळं म्हणजे लोकशाहीचा संपूर्ण अपमान आहे. या भाषणाने अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना कठोर शब्दांत जाब विचारला.