मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी चार शेतकऱ्याने संपवलं जीवन, परभणी, लातूर जिल्ह्यांतील घटना….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
परभणी :- “मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन, परभणी आणि लातूर जिल्ह्यांतील प्रत्येकी एका घटनेचा समावेश आहे.
फवारणीचे औषध सेवन
कर्ज, नापिकीमुळे त्रस्त शेतकऱ्याने गुरुवारी (ता. १७) फवारणीचे औषध घेऊन आत्महत्या केल्याचे सेलू (जि. परभणी) तालुक्यात समोर आले आहे. सोपान ज्ञानोबा बोराडे (वय ६५, रा. तिडी पिंपळगाव, ता. सेलू) असे त्यांचे नाव आहे. त्यांना परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान दुपारी चारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
विहिरीत घेतली उडी
कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गेवराई (मर्दा, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे आज घडली. भगवान शेषराव ढाकणे (वय ५२) असे त्यांचे नाव आहे. दुपारी दोनपर्यंत त्यांनी शेतात फवारणीचे काम केले. त्यानंतर विहिरीत उडी घेतली. दुपारी तीनच्या सुमारास मुलगा शेतात गेला तेव्हा ही घटना समोर आली. आडूळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. भगवान ढाकणे यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला.
गळफास घेऊन संपविले जीवन
आंतरवाली खांडी (ता. पैठण) येथील शेतकऱ्याने आज पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. लहू भीमराव डिघुळे (वय ५५) असे त्यांचे नाव आहे. पाचोड ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. शेती आणि मोलमजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत. कर्ज, घरखर्च कसा भागवावा, या विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले.
घरी घेतला गळफास
पावसाची उघडीप, कर्जाचा वाढता डोंगर, घरप्रपंच कसा चालवावा या विवंचनेतून गुरदाळ (ता. देवणी, जि. लातूर) येथील शेतकऱ्याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. १६) घडली. श्रीधर पंढरी घोगरे असे त्यांचे नाव आहे.