‘त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात 100 टक्के लागू करूच..’ CM फडणवीसांची माघार नाहीच, ठणकावून सांगितलं! ठाकरे बंधूंना थेट आव्हान?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “त्रिभाषा सूत्राचा जीआर मागे घेतल्यानंतर मनसे आणि शिवसेना UBT पक्षाने मुंबईत अत्यंत जल्लोषात विजयी मेळावा देखील साजरा केला. पण या गोष्टीला महिनाही उलटलेला नाही तोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका विशेष कार्यक्रमात ठणकावून सांगितलं की, महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र हे 100 टक्के लागू करूच!
‘आमच्याकरिता हा विषय प्रतिष्ठेचा नाही. पण एक गोष्ट निश्चित सांगतो की, तीन भाषा सूत्र हे महाराष्ट्रात लागू होईलच. पहिलीपासून की कधी ते कमिटी त्याबाबत ठरेवल. त्रिभाषा सूत्र 100 टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करू.. आणि माझा सगळ्यात जास्त विरोध कुठल्या गोष्टीला असेल तर ते म्हणजे.. इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि भारतीय भाषांना विरोध करायचा हे योग्य नाही. भारतीय भाषांचा विरोध हे मी सहन करणार नाही.’ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं.
‘त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात लागू करूच..’, पाहा CM फडणवीस नेमकं काय म्हणाले.
राज्यात त्रिभाषा सूत्रावरून जोरदार विरोध झाला. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘पहिल्यांदा हा जीआर जेव्हा निघाला त्यानंतर अनेकांशी चर्चा झाल्या. तोपर्यंत चर्चा काय होती की, हिंदी अनिवार्य का? आपण असं म्हटलं होतं की, तिसरी भाषा ही हिंदी असेल. तोपर्यंत सगळ्यांचं म्हणणं होतं की, हिंदी अनिवार्य का? यानंतर आम्ही सगळ्यांशी चर्चा केली मग आम्ही असा विचार केली की, हेही म्हणणं योग्य असू शकतं. त्यामुळे इतर पर्याय असले पाहिजे. म्हणून आपण जीआर बदलला आणि सांगितलं की, हिंदी अनिवार्य नाही.. हिंदी घ्यायची असेल तर हिंदी घ्या.. किंवा इतर कोणतीही भारतीय भाषा घ्यायची असेल तर ती भारतीय भाषा शिकवायला आम्ही तयार आहोत. पण 20 विद्यार्थी हवे नाही तर आम्हाला ती भाषा ऑनलाइन शिकवावी लागेल.’
‘समजा, 2 मुलांनी सांगितलं की, आम्हाला तेलुगू शिकवा.. तर शिक्षक कुठून आणायचे? पण यानंतर गोलपोस्ट बदलला.. गोलपोस्ट काय झाला की? तिसरीपासून का? सहावीपासून का नाही? तोपर्यंत गोलपोस्ट हा नव्हता. तोपर्यंत गोलपोस्ट हा होता की, हिंदीच का?’
‘त्यानंतर आम्ही सगळा अभ्यास केला. त्यात दोन मत आम्हाला पाहायला मिळाले. त्यात एक मत असं होतं की, तिसरीपासून याकरिता की, एक विविक्षित वय असतं की, ज्या वयामध्ये वेगवेगळ्या भाषा शिकू शकतो. एक कोवळं वय आहे.’
‘वेगवेगळ्या भाषा शिकल्यामुळे मुलांच्या आकलनशक्तीचा विकास होऊ शकतो. त्याचा बौद्धीक विकास होतो. अशाप्रकारच्या रिसर्चच्या आधारावरच केंद्र सरकारने देखील एनईपीमध्ये ही शिफारस केली आहे.’
‘पण त्यासंदर्भात वेगवेगळी मतं आल्याने आम्ही हा विचार केला की, हा अहवाल तर काही आपल्या काळात आला नव्हता. पुन्हा एकदा सगळ्यांची मतं ऐकून घेतली पाहिजे. म्हणून त्यावर आम्ही एक कमिटी तयार केली आहे. मी पुन्हा एकदा सांगतो.. आमच्याकरिता हा विषय प्रतिष्ठेचा नाही. पण एक गोष्ट निश्चित सांगतो की, तीन भाषा सूत्र हे महाराष्ट्रात लागू होईलच. पहिलीपासून की कधी ते कमिटी त्याबाबत ठरेवल.’
‘त्रिभाषा सूत्र 100 टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करू.. आणि माझा सगळ्यात जास्त विरोध कुठल्या गोष्टीला असेल तर ते म्हणजे.. इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि भारतीय भाषांना विरोध करायचा हे योग्य नाही. भारतीय भाषांचा विरोध हे मी सहन करणार नाही.’ असं ठामपणाने देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना फडणवीसांचं थेट आव्हान?
महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र हे काही केल्या लागू होऊ देणार नाही अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना UBT चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळाव्यात केलं होतं.
पण असं असताना आता CM देवेंद्र फडणवीस यांनी काहीही झालं तरी त्रिभाषा सूत्र लागू करणारच असं सांगितलं आहे. त्यामुळे आता फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना थेट आव्हान देण्यात आलं आहे.
यामुळे यापुढेही त्रिभाषा सूत्राचा मुद्दा हा अधिक तापण्याची शक्यता आहे. फडणवीसांनी जे मत व्यक्त केलं आहे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.