दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “दिल्ली ते गोवा विमानाची मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावी लागली आहे. इंडिगो कंपनीच्या या विमानाच्या एका इंजिनात बिघाड झाल्याने ही इमर्जन्सी लँडिंग करावी लागल्याचे समोर आले आहे.
विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.
प्राप्त माहितीनुसार, या विमानाच्या लँडिंगची वेळ रात्री ९:४२ वाजता होती. एका इंजिनमध्ये बिघाड झाल्याने पायलटने रात्री ९:२५ वाजता अलार्म वाजवला होता. यानंतर मग विमान मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. सुदैवाने पायलटच्या वेळीच लक्षात आल्याने अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे.
विमानात एकूण किती प्रवासी होते, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे समजले आहे. तसेच प्राप्त माहितीनुसार रात्री आठ वाजता या विमानाने दिल्लीहून गोव्याकडे उड्डाण घेतले होते. मात्र मध्येच बिघाड उद्बभवल्याने विमान मुंबईकडे वळवले गेले.
दरम्यान ”गेल्या महिन्यात अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताबाबत विमान अपघात तपास विभागाच्या (एएआयबी) प्राथमिक अहवालात विमान किंवा इंजिनामध्ये कोणताही तांत्रिक बिघाड किंवा देखभालीशी संबंधित समस्या आढळून आलेली नाही. सर्व अनिवार्य देखभालीचे कामही पूर्ण झाले होते,” असे ‘एअर इंडिया’चे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन यांनी म्हटले आहे. १२ जून रोजी झालेल्या दुर्घटनेत २६० लोकांचा मृत्यू झाल्यानंतर विविध स्तरांवर अपघाताच्या कारणांबाबत तर्कवितर्क केले जात होते. त्या पार्श्वभूमीवर ‘एअर इंडिया’चे सीईओ बोलत होते.
‘फ्युएल स्वीच’च्या तपासणीचे आदेश
याशिवाय, पुढील आठवडाभराच्या कालावधीत सर्व विमानांच्या इंजिनांच्या फ्युएल स्वीचची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) सर्व कंपन्यांना दिले आहेत. गुजरातमध्ये ‘एअर इंडिया’ कंपनीच्या विमानास झालेल्या अपघाताला दोन्ही इंजिनांचे बंद झालेले फ्युएल स्वीच कारणीभूत ठरल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आल्यामुळे सर्व कंपन्यांना हा आदेश देण्यात आला आहे. सर्व नोंदणीकृत विमानांनी इंजिनांच्या फ्युएल स्वीचची २१ जुलैपर्यंत तपासणी करणे अनिवार्य आहे.