“आपण महायुतीत आहोत, नितेशनं जपून बोलावं”, ‘त्या’ वक्तव्यानंतर भावाचा नितेश राणेंना सल्ला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचं एक (Nitesh Rane) वक्तव्य सध्या चर्चेत आहे. धाराशिव येथे नुकताच भाजप कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. ‘सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा’, असे वक्तव्य नितेश राणे यांनी या मेळाव्यात केलं होतं.
याही पुढे जाऊन त्यांनी म्हटलं होतं की ‘कुणी कितीही ताकद दाखवली, कुणी कसेही नाचले तरी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हेच खरे मुख्यमंत्री आहेत.’ त्यांच्या या वक्तव्यावर महायुतीतच नाराजी व्यक्त होत आहे. नितेश राणे यांचे सख्खे भाऊ आमदार निलेश राणे यांनीच त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. ‘नितेशने जपून बोलावे’, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.
आमदार निलेश राणे यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरुन एक पोस्ट लिहिली आहे. ‘नितेशने जपून बोलावे. मी भेटल्यावर बोलेनच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही.’ अशा शब्दांत त्यांनी भाऊ नितेश राणे यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे.
काय म्हणाले होते नितेश राणे ?
धाराशिव येथे नुकताच भाजप कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना मंत्री नितेश राणेंनी एक वक्तव्य केलं होतं. सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा. 2029 मध्ये सगळे आमदार भाजपचेच निवडून आले पाहिजेत. कुणी कितीही ताकद दाखवली किंवा कुणी कसेही नाचले तरी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री आहेत हे लक्षात ठेवा.
भाजपाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे लक्ष असतेच, म्हणूनच जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती मिळाली आहे असा टोला मंत्री राणे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला लगावला होता. त्यांच्या याच वक्तव्यावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी नितेश राणेंना समज दिली आहे. आता त्यांचा हा सल्ला नितेश राणे ऐकतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या मुद्द्यावर भाजप आणि शिवसेनेते धुसफूस सुरू आहे. शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेतील नियोजन समितीच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. महायुतीचं सरकार असतानाच स्थगिती दिली गेल्याने विरोधकांनी टीका सुरू केली आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या तक्रारीनंतरच स्थगिती दिली गेली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी केलेले वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..