ज्यांच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करतात, ते ही अतिरेकीच; पहलगामनंतर राजू शेट्टींच्या निशाण्यावर सरकार….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
परभणी :- “परभणीच्या माळसोन्ना गावामध्ये सचिन आणि ज्योती जाधव या शेतकरी दाम्पत्याने कर्जामुळे आत्महत्या केली होती. याच गावातून काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सरकारपर्यंत शेतकरी आत्महत्यांचा आवाज जावा, यासाठी माळसोन्ना ते परभणी अशी आक्रोश पदयात्रा काढली होती.
या पद यात्रेचा समारोप आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाला. यानंतर माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच राजू शेट्टी यांनी सचिन आणि ज्योती जाधव या शेतकरी दाम्पत्याच्या दोन्ही मुलींची शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, काश्मीरमधील पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. संपूर्ण देशाने त्याचा निषेध केला. जगभरात त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. अतिरेक्यांची घरे स्फोटाने उडवून देण्यात आली. त्यांच्यावर बुलडोझर चालवण्यात आला. त्याबद्दल सरकारचे अभिनंदन. पण ज्या लोकांच्या धोरणांमुळे दररोज सात शेतकरी आत्महत्या करत आहेत, हे सुद्धा अतिरेकीच आहेत. त्यांचं धोरण सुद्धा अतिरेकी धोरण आहे. त्यांनी कोणी जाब विचारायचा? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
आता मरायचे नाही, जाब विचारायचा
ते पुढे म्हणाले की, मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनंती करतो की, आता मरायचं नाही. कारण यांनी हे धोरण आपल्यावर लावलं, त्यामुळे आपली शेती कर्जाची व्हायला लागली आहे. शेतकऱ्यांचं कर्ज दिवसेंदिवस वाढतच चालले आहे आणि उत्पन्न मात्र कमी होत आहे. आता मरायचे नाही, याचा जाब विचारायचा.
अन्यथा तुमची आता सुटका नाही
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या तरुण मुलांना माझं आवाहन आहे की, त्यांनी जिथे तिथे महायुतीचे नेते येतील, त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांना विचारा, तुमची औकात नव्हती, तुमची लायकी नव्हती, तुम्हाला जमत नव्हता तर तुम्ही आमचं कर्ज माफ करतो असं खोटं आश्वासन का दिला? याचा जाब विचारा. मला माहित आहे की, यानंतर मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची धरपकड होईल. परंतु शेजारच्या जिल्ह्यातले कार्यकर्ते येतील. मंत्र्यांनो तुमचे दौरे आता आम्ही सहजासहजी होऊ देणार नाही. एक तर तातडीने कर्जमाफी जाहीर करा अन्यथा तुमची आता सुटका नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.