विदर्भामध्ये उष्म्याचा वणवा, चंद्रपूरचा पारा ४५.६ अंशांवर; आठ शहरे ४३ अंशांच्या पुढे….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “विदर्भामध्ये सूर्य अक्षरशः आग ओकू लागला असून येथील पाऱ्याने सोमवारी पुन्हा जोरदार उसळी घेतली. विदर्भातील बारापैकी तब्बल आठ शहरांचे कमाल तापमान ४३ अंशांच्या वर गेले असून, ४५.६ अंश तापमानासह चंद्रपूर देशासह संपूर्ण जगात ‘हॉट’ राहिले अशी माहिती जागतिक तापमानाची नोंद ठेवणाऱ्या ‘एल डोराडो’ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
दरम्यान, प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा (यलो अलर्ट) इशारा दिल्याने उन्हाचा कडाका वाढू शकतो.
विदर्भामध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून सूर्याचा प्रकोप सुरू आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्णतेच्या लाटेने अख्ख्या विदर्भालाच आपल्या कवेत घेतले आहे. दोन दिवसांपूर्वी ४४.७ अंशांवर गेलेला नागपूरचा पारा आज किंचित घसरून ४३.६ अंशांवर आला. चंद्रपूरवासीयांसाठी मात्र सोमवारचा दिवस सर्वाधिक तापदायक ठरला. रविवारी देशात व जगात सर्वाधिक तापमानाची नोंद झालेल्या चंद्रपूरचा पारा आज एका अंशाने वाढून या मोसमातील उच्चांक ४५.६ अंशावर गेला. येथे नोंद झालेले तापमान केवळ विदर्भ व राज्यातच नव्हे, संपूर्ण देशात व जगात सर्वाधिक होते. उल्लेखनीय म्हणजे, लागोपाठ दुसऱ्या दिवशी येथे जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तशी नोंद जागतिक तापमानाची नोंद ठेवणाऱ्या ‘एल डोराडो’ या संकेतस्थळावर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सोमवारी जगातील पहिल्या बारा ‘हॉट’ शहरांत चार शहरे ही एकट्या विदर्भातील आहेत.
दिवसभर असह्य उकाडा
चंद्रपूर खालोखाल ब्रह्मपुरी (४५.० अंश सेल्सिअस), अमरावती (४४.६ अंश सेल्सिअस), अकोला (४४.१ अंश सेल्सिअस), वर्धा (४३.४ अंश सेल्सिअस), यवतमाळ (४३.४ अंश सेल्सिअस) आणि गडचिरोली (४३.० अंश सेल्सिअस) येथेही उन्हाचे जोरदार चटके बसले. उष्णतेच्या लाटेमुळे दिवसभर असह्य उकाडा जाणवला. अंगातून घामाचे लोट वाहत होते. सायंकाळपर्यंत झळा जाणवत होत्या. नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस उन्हाचा यलो अलर्ट असल्यामुळे उन्हाचे चटके आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
जळगावमध्येही भडका उडणार
राज्यात एप्रिल महिन्यात सूर्य आग ओकू लागला आहे. कमाल तापमानाचे उच्चांक नोंदविणाऱ्या जळगाव जिल्ह्यातही आगामी चार दिवस तीव्र उष्णता व तापमानाचे असून या चार दिवसांत तापमानाचा पारा ४३ अंशांवर पोहोचण्याची चिन्हे आहेत. राज्यात कमाल तापमानाच्या बाबतीत जळगाव जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. आतापर्यंत गेल्या पंधरवड्यात जळगाव जिल्ह्यातील कमाल तापमानाने ४२-४३ अंशांचा आकडा तीन- चारदा पार केला आहे. आता हवामान खात्याने पुन्हा जळगाव जिल्ह्यासह खानदेशात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. जळगाव जिल्ह्यात २१ ते २५ एप्रिलदरम्यान कमाल तापमान ४३ ते ४४ अंशांवर पोहोचण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा देताना २५ एप्रिलला जळगाव जिल्ह्यात तापमानाचा ‘येलो ॲलर्ट’ जाहीर केला आहे. मे महिना अद्याप यायचा असल्याने एप्रिल महिन्यातच तापमानाची तीव्रता प्रचंड वाढल्यामुळे नागरिकांच्या जिवाची काहिली होत आहे.
परभणी, नांदेड ४२ अंशांवर
मराठवाड्यामध्येही उष्णता वाढत चालली असून सोमवारी परभणी आणि नांदेड जिल्ह्यांत सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात सरासरी ४१ अंश तापमानाची नोंद झाली आहे. छत्रपती संभाजीनगर (कमाल ४०.९- किमान २५.२ अं.सेल्सिअस), लातूर (कमाल ४०.९- किमान २८), हिंगोली (कमाल ४१.९- किमान २४), धाराशिव (कमाल ४१- किमान २६), परभणी (कमाल ४२.३२- किमान २५.५) आणि नांदेड (कमाल ४२.२५- किमान २५) या शहरांमध्ये तापमान वाढले आहे.