मराठीत शक्ती, भक्ती, युक्तीही; दिल्लीत सारस्वतांच्या मेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गौरवोद्गार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “मराठी भाषेमध्ये शौर्य आणि वीरता, सौंदर्य आणि संवेदना, समानता आणि समरसता आहे. त्यात आध्यात्माचे स्वर आणि आधुनिकतेची लाटही आहे. मराठी भाषेत भक्ती, शक्ती आणि युक्ती आहे,” अशा शब्दांत मराठीची मुक्तकंठाने प्रशंसा करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन केले.
दिल्लीच्या भूमीवर मराठी भाषेच्या या गौरवशाली कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. अ.भा. मराठी साहित्य संमेलन हे एक भाषा किंवा राज्यापुरते मर्यादित नाही. या संमेलनात स्वातंत्र्यलढ्याचा सुगंध आहे. त्यात महाराष्ट्र आणि राष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहे. ज्ञानबा-तुकारामांच्या मराठीला आज राजधानी दिल्ली मनापासून अभिवादन करते.
भाषा केवळ संवादाचे माध्यम नाही तर आमची भाषा आमच्या संस्कृतीचीही संवाहक असते. भाषा समाजात जन्मतात, पण भाषा समाजनिर्मितीतही तेवढीच महत्त्वाची भूमिका बजावते. आमच्या मराठीने महाराष्ट्र आणि देशातील असंख्य लोकांच्या विचारांना अभिव्यक्ती देऊन आमची सांस्कृतिक निर्मिती केली आहे. १८७८ साली झालेल्या पहिल्या संमेलनापासून आजवर अ.भा. मराठी साहित्य संमेलन हे देशाच्या १४७ वर्षांच्या यात्रेचा साक्षीदार ठरले आहे याचे स्मरण पंतप्रधान मोदी यांनी करून दिले.
मान्यवरांची उपस्थिती राजधानी दिल्लीत ७१ वर्षांनंतर होत असलेल्या या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. व्यासपीठावर ९८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार, अ.भा. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, साहित्य संमेलनाचे निमंत्रक संजय नहार, माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, खजिनदार प्रकाश पागे आणि कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहंदळे उपस्थित होत्या. यावेळी विज्ञान भवन मराठी सारस्वत आणि साहित्यप्रेमींनी खच्चून भरले होते.
सारस्वतांना माझा नमस्कार
भाषणाची सुरुवात हिंदीतून केल्यानंतर पंतप्रधान मोदी मराठीकडे वळले. देशाच्या आर्थिक राजधानीच्या राज्यातून देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व मराठी सारस्वतांना माझा नमस्कार असे म्हणत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. ”आज जागतिक मातृभाषा दिवस आहे. तुम्ही दिल्लीतील साहित्य संमेलनासाठीचा दिवस सुद्धा अतिशय चांगला निवडला आहे,” अशी प्रशस्ती त्यांनी दिली. जेव्हा भारताला आध्यात्मिक ऊर्जेची गरज भासली तेव्हा महाराष्ट्रातील महान संतांनी ऋषींचे ज्ञान मराठी भाषेत सुलभ केले.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास, संत नामदेव, संत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा, गोरा कुंभार आणि बहिणाबाईसारख्या महाराष्ट्राच्या अनेक संतांनी भक्ती आंदोलनाच्या माध्यमातून मराठी भाषेत समाजाला नवी दिशा दाखविली. आधुनिक काळातही गदिमा आणि सुधीर फडके यांच्या गीतरामायणाने टाकलेला प्रभाव सर्वपरिचित आहे असे मोदी म्हणाले.
मराठी मुक्तीचा जयघोष बनली
मोदी म्हणाले की गुलामीच्या शेकडो वर्षांच्या दीर्घ कालखंडातही मराठी भाषा आक्रमकांपासून मुक्ती मिळविण्यासाठीचा जयघोष बनली. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि बाजीराव पेशव्यांनी शत्रूंच्या नाकी नऊ आणले. स्वातंत्र्यलढ्यात वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक आणि वीर सावरकरांनी इंग्रजांची झोप उडविली. त्यांच्या या योगदानात मराठी भाषा आणि मराठी साहित्याचा मोठा वाटा होता.
केसरी आणि मराठासारखी वृत्तपत्रे, गोविंदाग्रजांच्या ओजस्वी कविता, राम गणेश गडकरी यांची नाटके यांच्या मराठी साहित्यातून निघालेल्या राष्ट्रप्रेमाच्या प्रवाहाने संपूर्ण देशात स्वातंत्र्य आंदोलनाचे सिंचन केले. लोकमान्य टिळकांच्या मराठीतील गीतारहस्याने संपूर्ण देशात नवी ऊर्जा भरली. मराठी भाषा आणि साहित्याने समाजाच्या शोषित, वंचित वर्गासाठी सामाजिक मुक्तीची दारे उघडण्याचेही काम केले. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महान समाजसुधारकांनी नव्या युगाचे विचार दिले. मराठी भाषेने देशाला अतिशय समृद्ध असे दलित साहित्य दिले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गुणगान
महाराष्ट्राच्या भूमीवर एका मराठी भाषिक महापुरुषाने शंभर वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बीजारोपण केले होते. आज एका वटवृक्षाच्या रूपाने संघ आपले शताब्दी वर्ष साजरे करीत आहे. वेदांपासून विवेकानंदांपर्यंत भारताच्या महान परंपरा आणि संस्कृतीला नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा एक संस्कार यज्ञ रा.स्व.संघाने गेल्या शंभर वर्षांपासून प्रज्वलित केला असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. आपल्यासारख्या लाखो लोकांना संघाने देशासाठी जगण्याची प्रेरणा दिली, हे आपले भाग्य आहे. संघामुळेच आपल्याला मराठी भाषा आणि मराठी परंपरेशी जोडले जाण्याचे भाग्य लाभले असे मोदी म्हणाले.
हे तर माझे भाग्य
” काही महिन्यांपूर्वी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. देशात आणि जगात बारा कोटींपेक्षा जास्त मराठी भाषिक आहेत. अभिजात भाषेच्या दर्जाची कोट्यवधी मराठी भाषिकांना प्रतीक्षा होती. हे काम पूर्ण करण्याची आपल्या संधी मिळाली हे मी आपल्या आयुष्यातील मोठे भाग्य मानतो,” अशी मराठीप्रतीची कृतज्ञता पंतप्रधानांनी व्यक्त केली.
पंतप्रधान म्हणाले
मराठी वैविध्यपूर्ण अन् ज्ञानभाषा
भाषा कोणाशी भेदभाव करीत नाही
भाषा प्रत्येक विचाराला आलिंगन देते
मराठीवर प्राकृत भाषेचाही प्रभाव
भारतीय भाषांमध्ये परस्पर वैर नव्हते
मी मराठी शिकण्याचा प्रयत्न केला
संतांनी अाध्यात्मिक ऊर्जा दिली
रा. स्व. संघामुळे मराठी भाषेच्या जवळ आलो
‘छावा’ चित्रपटाचा उल्लेख
आपल्या आधुनिक चिंतनामुळे मराठी साहित्यात विज्ञान कथांची रचना झाली आणि आयुर्वेद, विज्ञान आणि तर्कशास्त्रामध्ये महाराष्ट्राच्या लोकांनी दिलेले योगदान अद्भूत आहे. याच संस्कृतीमुळे महाराष्ट्राने नेहमीच नवे विचार आणि प्रतिभांना आमंत्रित करून प्रगती साधली. आमची मुंबई महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी म्हणून नावारूपाला आली आहे. आजकाल तर ‘छावा’ची धूम आहे. संभाजी महाराजांच्या शौर्याचा या रुपातील परिचय शिवाजी सावंत यांच्या मराठी कादंबरीनेच करून दिला आहे असा उल्लेख मोदींनी केला. त्यावर उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे ‘संभाजी महाराज की जय’ च्या घोषणा देत त्यांना दाद दिली.
कसा विश्वास ठेवायचा?
”आपल्याकडे मासिक पाळीला विटाळ म्हटले जाते. मात्र मला असा एखादा माणूस दाखवून द्या की जो विटाळाच्या स्थानातून जन्माला आलेला नाही. आता आजही एखादा म्हणतो की माझा जन्म जैविक नाही वगैरे, त्याच्यावर आपण किती विश्वास ठेवायचा हा भाग वेगळा,” असे म्हणत डॉ. भवाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….