निवडणुकांमुळे हात ढिला सोडला होता, पण आता..; अजित पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “येत्या ३ मार्चपासून राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनात महायुती सरकारकडून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प मांडणार आहेत. अर्थसंकल्पात कठोर निर्णय घ्यावे लागतील.
राज्याचे आर्थिक स्त्रोत वाढवावे लागतील, असे स्पष्ट करत आत्तापासूनच आढावा सुरू असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. तसेच गेल्या वर्षी निवडणुकांमुळे हात ढिला सोडला होता. मात्र, येत्या अर्थसंकल्पात राज्याच्या पुढील पाच वर्षांच्या वाटचालीचा पाया रचला जाणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा अजित पवार यांनी यावेळी बोलताना दिला.
राज्याचे आर्थिक स्त्रोत वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागणारे असून तशा द्दष्टीने विभागांना सूचना दिल्याचेही पवार यांनी सांगितले. आपण स्वत: रोज सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत बसून विविध विभागांचा आढावा घेत आहोत. राज्याचे आर्थिक उत्पन्न कसे वाढेल, यादृष्टीने नियोजन सुरू असून त्याचे प्रतिबिंब येत्या अर्थसंकल्पात दिसेल, असे देखील पवार यावेळी बोलताना म्हणाले.
महायुती सरकारीची ड्रीम योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण असून या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर मोठा ताण येणार आहे. तसेच राज्य सरकारचे कर्मचारी त्यांचे वेतनावार मोठा खर्च सरकारला करावा लागणार आहे. विविध विकास कामांसाठी देखील सरकारला निधीची तरतूद करावी लागणार आहे. यामुळे निर्माण होणारी वित्तीय तूट मर्यादेत ठेवण्याचे आव्हान देखील असणार असल्याचे माहिती पवार यांनी यावेळी दिली.
माध्यमांनी वस्तुनिष्ठता बघावी
सध्या माध्यमांमध्ये आमच्या बाबातच्या माहिती नसलेल्या बातम्या सूत्रांचा हवाला घेऊन दिल्या जातात. अजित पवार कुठे दिसले नाहीत की नॉट रिचेबल, अजित पवार कुठे गेले अशा बातम्या सुरू होतात. यामुळे एखाद्या घटनेची वस्तुनिष्ठता तपासूनच माध्यमांनी बातमी द्यावी, असे आव्हान अजित पवार यांनी यावेळी केले. तसेच अशा प्रकाराचे सनसनाटी वार्तांकनावर नाराजी व्यक्त केली.