उद्धव ठाकरेंचा शिलेदार अडचणीत? राजन साळवींच्या पाठीमागे ACB चा ससेमिरा, व्यावसायिक भागीदाराला चौकशीला केले पाचारण…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवी यांच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. त्यांचा मुलगा आणि पुतण्यांच्या बांधकाम व्यवसायातील भागीदार दिनकर सावंत यांना लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने ACB ने नोटीस बजावली आहे.
त्यांना आज चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. दिनकर सावंत हे 22 जानेवारी रोजी रत्नागिरी येथील एसीबी कार्यालयात चौकशीला सामोरे जाणार असल्याचे समजते.
आज सावंत एसीबी कार्यालयात
रत्नागिरी शहरापासून काही अंतरावर संबंधित बांधकाम साईट आहे. एसीबीने जो नोटीस पाठवली आहे. त्यात या साईटचा उल्लेख करण्यात आला आहे. यापूर्वी राजन साळवी यांचा मुलगा शुभम साळवी याचा एसीबीने जबाब नोंदवला होता. आता त्यांचे व्यावसायिक भागीदार दिनकर सावंत यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यांना आज, 22 जानेवारी रोजी एसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. सावंत आज एसीबी कार्यालयात हजर राहण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी सावंत यांना ACB ची नोटीस
काही दिवसांपूर्वी दिनकर सावंत यांना एसीबीची नोटीस देण्यात आली होती. रत्नागिरी नगरपरिषदेच्या दांडेआडम इथल्या घनकचरा प्रकल्पाच्या वॉल फेसिंगचे सावंत आणि साळवी कुटुंबाने एकत्र काम केले होते. मुलगा शुभम साळवी याने दिलेल्या जबानीनंतर व्यावसायिक पार्टनर असलेल्या दिनकर सावंत यांची आज चौकशी होणार आहे. दिनकर सावंत यांना साळवी कुटुंबासोबत भागिदार म्हणून असताना टेंडर फाईल आणि इतर कागदपत्रे एससीबीने मागवली आहे. दिनकर सावंत यांना आज रत्नागिरी येथील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचा नोटीसमध्ये उल्लेख आहे. आज सकाळी ११ वाजता दिनकर सावंत एससीबी कार्यालयात हजर राहणार, चौकशीवेळी साळवी कुटुंबामधील कुणी व्यक्ती सावंत यांच्या सोबत नसेल.
गुन्ह्याचा नोटीसमध्ये उल्लेख
एसीबीने दिलेल्या नोटीसमध्ये साळवी कुटुंबियांविरोधातील गुन्ह्याचा उल्लेख आहे. राजन प्रभाकर साळवी, त्यांची पत्नी अनुजा राजन साळवी आणि मुलगा शुभम राजन साळवी यांच्याविरुद्ध 18 जानेवारी 2024 रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमचे कलम 13(1) (ब) सह 13(2) व कलम 12 प्रमाणे अपसंपदेचा गुन्हा दाखल केल्याचे नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे.