स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “दिल्ली विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतली आहे.
दुसरीकडे भाजपाने आतापर्यंत ५८ उमेदवारांची घोषणा केली असून अद्याप १२ उमेदवारांची नावे जाहीर होणे बाकी आहे. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना भाजपाकडून निवडणुकीचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. ग्रेटर कैलास विधानसभा मतदारसंघातून त्या भाजपाच्या उमेदवार असू शकतात, असं सूत्रांनी सांगितलं आहे. सध्या या मतदारसंघावर सत्ताधारी आम आदमी पार्टीचे वर्चस्व आहे.
२०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपचे उमेदवार सौरभ भारद्वाज यांनी ग्रेटर कैलास मतदारसंघातून मोठा विजय मिळवला होता. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे विश्वासू म्हणून भारद्वाज यांची ओळख आहे. मुख्यमंत्री आतिशी यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारमध्ये ते मंत्रीही आहेत. दरम्यान, सौरभ भारद्वाज यांना शह देण्यासाठी भाजपाकडून रणनीती आखली जात आहे.
स्मृती इराणी यांना मिळणार निवडणुकीचं तिकीट?
माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या ग्रेटर कैलास मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार असू शकतात, अशा चर्चा दिल्लीत सुरू आहेत. मात्र, भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने या चर्चांचं खंडन केलं आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांना पराभव स्वीकारावा लागला होता, त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट मिळण्याची कमी शक्यता आहे, असं भाजपा नेत्याने म्हटलं आहे. त्याचबरोबर या जागेसाठी इतर महिला नेता उत्सुक असून त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही, असंही भाजपा नेत्याने सांगितलं आहे.
२०१९ मध्ये राहुल गांधींचा केला होता पराभव
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी काँग्रेसच्या अमेठी लोकसभा मतदारसंघात भाजपाचं कमळ फुलवलं होतं. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. तेव्हा स्मृती इराणी यांना पक्षामध्ये महत्वाचं स्थान मिळालं होतं. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार किशोरी लाल शर्मा यांनी त्यांचा पराभव केला. दरम्यान, भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले की, “स्मृती इराणी यांच्याकडे उत्कृष्ट भाषणं देण्याची कला आहे आणि त्या एक लोकप्रिय नेत्याही आहेत, त्यामुळे राजधानीतील सर्व समीकरणे लक्षात घेऊन त्यांना निवडणुकीचं तिकीट दिलं जाऊ शकतं. भाजपाचे वरिष्ठ नेतेही इराणी यांच्याकडे आघाडीच्या नेत्या म्हणून पाहत आहेत.”
सौरभ भारद्वाज विरुद्ध स्मृती इराणी होणार लढत?
भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, “आमच्यासाठी ग्रेटर कैलास विधानसभा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा आहे. स्मृती इराणी भाजपाच्या लोकप्रिय नेत्या असून त्या सौरभ भारद्वाज यांना कडवी झुंज देऊ शकतात. इराणी यांच्याव्यतिरिक्त पक्षाकडून इतर महिला नेत्यांच्या नावांचादेखील विचार केला जात आहे. यामध्ये भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या आणि माजी महापौर आरती मेहरा, ग्रेटर कैलास वॉर्डमधील नगरसेविका शिखा राय आणि माजी केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांच्या नावांचा समावेश आहे.”
ग्रेटर कैलास मतदारसंघावर कुणाचं वर्चस्व?
दरम्यान, २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने ग्रेटर कैलास विधानसभा मतदारसंघातून माजी महापौर आरती मेहरा यांना उमेदवारी दिली होती. मात्र, आम आदमी पार्टीचे उमेदवार सौरभ भारद्वाज यांनी तब्बल १६ हजार मताधिक्याने त्यांचा पराभव केला होता. दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांना दिल्ली ‘कॅन्ट’ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे, त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने ग्रेटर कैलास मतदारसंघातून इराणी यांच्या नावाचा विचार करायला हवा, अशी विनंती दिल्लीतील एका ज्येष्ठ नेत्याने भाजपा हायकमांडला केली आहे.
दरम्यान, मंत्री सौरभ भारद्वाज हे ग्रेटर कैलास मतदारसंघातून तीनवेळा निवडून आलेले आहेत. दिल्ली सरकारमध्ये त्यांच्याकडे अनेक महत्त्वाची खाती आहेत. मात्र, यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. कारण, आम आदमी पार्टीला सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागत आहे. त्यातच भाजपाने ‘आप’च्या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात पक्षातील लोकप्रिय चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. यामध्ये कालकाजीमध्ये मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरोधात प्रवेश वर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
‘आप’ला शह देण्यासाठी भाजपाची रणनीती काय?
माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मतदारसंघातून भाजपाने मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा मुलगा संदीप यांना उमेदवारी दिली आहे. सध्या भाजपाकडून आक्रमक प्रचार केला जात असला तरी पक्षातील नेते सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत आहेत. २०१५ मध्ये भाजपाने शेवटच्या क्षणी माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. त्यावेळी पक्षाला मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. यावेळी भाजपाचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….