इंडिया आघाडी विसर्जित होणार? केजरीवालांना पाठिंबा देण्यावरून दोन गट; अखिलेश यादव यांनी स्पष्टच सांगितले…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये धुसफूस चालू असल्याचं गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. त्यामुळे इंडिया आघाडी आता फुटण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा चालू आहे.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केलेली टीका, त्यांनी ईव्हीएमबाबत काँग्रेसविरोधात घेतलेली भूमिका, त्यानंतर अरविंद केजरीवाल व ममता बॅनर्जींनी दिलेला ‘एकला चलो रे’चा नारा आणि आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दिलेला स्वबळाचा नारा पाहून इंडिया आघाडी आता केवळ नावापुरतीच राहिली आहे असं त्यांचे विरोधक बोलू लागले आहेत. दरम्यान, इंडिया आघाडीतील प्रमुख नेते तथा समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी इंडिया आघाडीमधील संघर्षाबाबतच्या, आघाडीत फूट पडल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तसेच आमची इंडिया आघाडी मजबूत आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. यादव म्हणाले, “भाजपाविरोधात प्रादेशिक पक्षांना एकत्र करण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली होती. समाजवादी पार्टी या आघाडीला बळकट करण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही भाजपाविरोधात लढणाऱ्या सर्व पक्षांबरोबर निर्धाराने उभे आहोत. भाजपाच्या विरोधकांना मदत करण्यास आमचा पक्ष नेहमीच सज्ज असेल”.
‘इंडिया’तील अनेक पक्षांनी आघाडीबाबत नकारात्मक वक्तव्ये केल्यानंतर यादव यांनी मात्र आघाडी मजबूत असल्याचा खुलासा केला आहे. तर, काँग्रेस खासदार मनीष तिवारी म्हणाले, “केवळ लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इंडिया आघाडी बनवण्यात आली नव्हती. आपल्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी, देशाचा आत्मा टिकवण्यासाठी ही आघाडी बनवण्यात आली होती. त्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत आम्ही चांगली कामगिरी केली. आमच्या एकीमुळे अनेक राज्यांमध्ये भाजपाचं वर्चस्व कमी झालं आहे. आघाडीतील सर्व नेते एकत्र येऊन आमची, इंडिया आघाडीची पुढील वाटचाल कशी असेल याबाबत निर्णय घेतील”.
इंडिया आघाडीबद्दल स्पष्टता नाही : ओमर अब्दुल्ला
अखिलेश यादव व मनिष तिवारी यांनी आघाडी मजबूत असल्याची सारवासारव केली असली तरी आघाडीमधील सर्व पक्षांचं एकसारखं मत असल्याचं पाहायला मिळालेलं नाही. ओमर अब्दुल्ला म्हणाले, “इंडिया आघाडी कधीपर्यंत असेल, असं काही ठरलं नव्हतं. कोणतीही वेळ मर्यादा निश्चित केली नव्हती. लोकसभा व अलीकडच्या विधानसभा निवडणुकांनंतर दुर्दैवाने आमची कोणतीही बैठक पार पडलेली नाही. तसेच नेतृत्वाने अद्याप यावर कोणतीही टिप्पणी केलेली नाही. इंडिया आघाडीचं नेतृत्व कोण करणार? ‘इंडिया’चा आगामी काळातील अजेंडा काय असेल? इंडिया आघाडी यापुढेची चालू ठेवायची की नाही? याबद्दल कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही. त्यांमुळे वरिष्ठांनी इंडिया आघाडीतील पक्षांची बैठक बोलावली तर बरं होईल. इंडिया आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीपुरती होती की यापुढेही चालू राहणार आहे याबद्दल स्पष्टता नाही.
इंडिया आघाडी जपण्यात काँग्रेस अपयशी; शिवसेनेचा (ठाकरे) आरोप
दरम्यान, शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर आरोप केला आहे की “लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीमधील एकजूट कायम राखण्यात काँग्रेस नेतृत्व अपयशी ठरलं आहे”. तसेच ते म्हणाले, “मी ओमर अब्दुल्ला यांच्या वक्तव्याशी सहमत आहे. त्यांनी व्यक्त केलेली चिंता देखील रास्त आहे. लोकसभा निवडणुकीत जरी आम्हाला यश मिळालं असलं तरी इंडिया आघाडीत सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसची जबाबदारी होती की त्यांनी ही आघाडी जपायला हवी. त्यांनी सर्व पक्षांची एकजूट कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवे. इंडिया आघाडीला एकसंध ठेवायला हवं. इंडिया आघाडीतील अनेक नेते, जसे की ओमर अब्दुल्ला, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल म्हणत आहेत की आता इंडिया आघाडीचं अस्तित्व राहिलेलं नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा (ठाकरे) स्वबळाचा नारा
दरम्यान, संजय राऊत यांनी स्पष्ट केलं की लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी व महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी स्थापन करण्यात आली होती. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडी म्हणून लढता येणार नाहीत. कारण या निवडणुका तळागाळात संघटना मजबूत करण्यासाठी, गावखेड्यात, शहरांमध्ये कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी असतात. पक्षाच्या बळकटीकरणासाठी या निवडणुका असतात. मी किंवा माझ्या पक्षाने कधीच म्हटलेलं नाही की इंडिया आघाडी अथवा महाविकास आघाडी आता विसर्जित केली पाहिजे. राज्य व राष्ट्रीय स्तरावर आम्ही एकत्रच आहोत.
‘इंडिया’त केजरीवालांना पाठिंबा देण्यावरून दोन गट
दरम्यान, आम आदमी पार्टीने दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. तर, शिवसेनेने (ठाकरे) या निवडणुकीत काँग्रेसऐवजी आम आदमी पार्टीला पाठिंबा दिला आहे. केजरीवाल म्हणाले होते की दिल्लीत भाजपा विरुद्ध इंडिया आघाडी नव्हे तर, भाजपा विरुद्ध आप असा सामना होणार आहे. तसेच या निवडणुकीत समाजवादी पार्टी व तृणमूल काँग्रेसनेही ‘आप’ला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर केजरीवाल यांनी ममता बॅनर्जी, अखिलेश यादव व उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रीय ताकद तेजस्वी यादव यांच्यामागे..!
आता महाराष्ट्रात मोठा राजकीय धमाका होणार…!