राजकारणात काहीही होऊ शकतं; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. महायुतीच्या त्सुनामीचा महाविकास आघाडीला जोरदार फटका बसला. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि महायुतीवर टोकाची टीका केली होती.
त्यानंतर आता पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राजकारणात काहीही होऊ शकतं, असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात जाहीर मुलाखत झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्रात राजकीय संस्कृती आहे. दक्षिणेत दोन पक्षाचे नेते एकमेकांशी बोलू शकत नाही. ती परिस्थिती महाराष्ट्रात कधीच नव्हती. दुर्दैवाने २०१९ ते २०२४ सालात वाईट परिस्थिती निर्माण झाली. पण मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्याच भाषणात महाराष्ट्रात राजकीय संस्कृतीत बदल घडवणारं राजकारण करायचं आहे. बदला घेण्याचं राजकारण करायचं नाही. लोकांनी भिंत तोडली, ही चांगली गोष्ट आहे’.
शरद पवारांनी केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कौतुवावरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केलं. ‘लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला फेक नॅरेटिव्ह तयार करण्यात यश आलं. लोकसभेच्या निवडणुकीत माझ्यासहित सगळेच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होते. महाराष्ट्राच्या निवडणुका जवळ होत्या, आताची परिस्थिती अराजकतावादी विरुद्ध राष्ट्रीय विचाराने उतरणे गरजेचं आहे. त्यामुळे आपली भूमिका निभावली. फेक नॅरेटिव्हिवचा फुगा फुटला. लोकसभेपेक्षा विधानसभा निकालात धुवून निघाली. शरद पवार हे चाणाक्ष आहे, ही शक्ती राष्ट्रकारण करणारी शक्ती आहे. त्यामुळे त्यांनी कौतुक केले’.
महाविकास आघाडीतील काही पक्षांची जवळीक वाढणार का, यावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘2019 नंतर 2024 पर्यंत जे घडलं. ते होणार नाही, असं समजून चालायचं नाही. राजकारणात काहीही होऊ शकतं. कुठून काही होईल हे सांगता येत नाही’. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध घडामोडींवरही भाष्य केलं.