स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापूला ‘सु्प्रीम’ दिलासा; 31 मार्चपर्यंत जामीन मंजूर…

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “2013 सालच्या बलात्कार प्रकरणात दोषी असलेल्या स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाने 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला.
वैद्यकीय कारणास्तव हा जामीन देण्यात आला असून, आसारामने पुराव्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करू नये आणि अंतरिम जामिनावर सुटल्यानंतर त्यांच्या अनुयायांना भेटू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निर्देश दिले आहेत. आसाराम बापूला 2013 सालच्या बलात्कार प्रकरणात गांधीनगरच्या कनिष्ठ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तेव्हापासून आसाराम बापू तुरुंगात आहे.
आसारामच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयात अनेकवेळा अर्ज दाखल केले आहेत. केवळ वैद्यकीय कारणांचा विचार करता येईल, असे न्यायालयाचे स्पष्ट म्हणणे आहे. याशिवाय कोणत्याही प्रकारचा दिलासा दिला जाणार नाही. शिक्षेला स्थगिती देण्याची याचिका न्यायालयाने यापूर्वीच फेटाळली आहे. त्यानंतर आज कोर्टाने आसारामला सशर्त जामीन मंजूर केला आहे. तसेच जामिनाच्या कालावधीत देखरेखीसाठी सुरक्षा कर्मचारी तैनात करावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
गांधीनगर कोर्टाने सुनावली आहे जन्मठेपेची शिक्षा
आसारामला जोधपूर पोलिसांनी 31 ऑगस्ट 2013 रोजी बालात्काराच्या प्रकरणात अटक केली. जोधपूरजवळील मनाई गावात असलेल्या त्याच्या आश्रमात एका किशोरवयीन मुलीने आसारामवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील रहिवासी असलेली ही मुलगी आश्रमात विद्यार्थिनी होती. त्यानंतर बलात्कार प्रकरणात गांधीनगरच्या कनिष्ठ न्यायालयाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आसाराम गेल्या साडेअकरा वर्षांपासून तुरुंगात आहे.
मुलगाही आहे तुरुंगात
पीडितेच्या बहिणीनेही आसाराम बापूंचा मुलगा नारायण साई याच्यावरही बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात एप्रिल 2019 मध्ये नारायण साईला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. आसारामच्या खटल्यातील एफआयआर 2013 मध्ये अहमदाबादमधील चांदखेडा पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. सध्या नारायण साईदेखील तुरुंगात आहे.