बड्या उद्योगपतीच्या घरी शरद पवार-भाजपच्या वरिष्ठ नेत्याची बैठक…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांच्या विचारसणीचे स्मरण होऊन जनसंघ-भाजपच्या वळचणीला जायचे नाही, असा निर्धार बोलून दाखवत सत्तेविरोधात संघर्ष करण्याची भूमिका स्वीकारली.
परंतु सत्तेच्या बाहेर फार दिवस राहू शकत नाही, ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाची प्रकृती असल्याने झाला एवढा संघर्ष बस्स झाला, आता सत्तेत जायला हवे, असे मत शरदचंद्र पवार पक्षातील एका गटाचे आहे. सध्या राजकारणात पडद्याआडून महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि अर्थनीतीमुळे लोकप्रिय असलेले उद्योगपती गौतम अदानी यांच्या घरी शरद पवार पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याची भाजपच्या वरिष्ठ नेत्याने भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेला भाजपविरोधात सशक्तपणे लढणाऱ्या महाविकास आघाडीला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पक्षातील नेत्यांसह इतरही दिग्गज नेत्यांनी ६ जनपथ निवासस्थानी गर्दी केली होती. महाराष्ट्राची उदात्त राजकीय संस्कृती साक्षीला ठेवून इतर पक्षातील नेत्यांनीही त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. वाढदिवसाच्या निमित्ताने भेटीगाठींचा सिलसिला सुरू असतानाच गुरुवारी रात्री अदानी यांच्या घरी भाजपच्या केंद्रीय नेत्याने शरद पवार यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्याची भेट घेऊन सुमारे तासभर चर्चा केली.
उभय नेत्यांच्या भेटीत मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील इतर महानगरपालिका निवडणुकांत राष्ट्रवादीची भूमिका काय असेल, याबाबत चर्चा केली तसेच आगामी काळातील पक्षाच्या राजकीय आणि वैचारिक भूमिकांवरही चर्चा झाल्याची मागिती आहे. सत्तावाटपात योग्य तो सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही भाजप नेत्याने राष्ट्रवादीला दिली.
परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सत्तेत सामील होण्यावरून सध्या दोन मतप्रवाह आहेत. आपण भाजप सोबत सत्तेत जायला हवे, असे एका गटाला वाटते तर सत्तेत सहभागी न होता, सत्तेबाहेर राहून संघर्ष करून लोकांची मने जिंकू. सत्ता आपल्यापासून फार लांब नसेल, असे पक्षातील दुसऱ्या गटाला वाटत असल्याचे समजते. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे ८ लोकसभा खासदार तर राज्यसभेत २ खासदार आहेत.
शरद पवार भाजपसोबत जाणे शक्य नाही
ज्या लोकांनी शरद पवार यांचा पक्ष फोडला, त्यांच्या उतारवयात त्यांना यातना दिल्या, त्यांच्यासोबत जाणे शरद पवार पसंत करणार नाहीत, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकसंधपणे भाजपशी दोन हात करते आहे, इथून पुढेही करेल, असे राऊत म्हणाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..