मंगेश चिवटेंना हटवलं, रामेश्वर नाईक नवे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यात नवे सरकार आल्यानंतर आणि मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांना पहिला मोठा झटका बसला आहे. एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू असलेले मंगेश चिवटे यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाच्या प्रमुखपद काढून घेण्यात आले आहे.
त्यांच्याऐवजी आता डॉ. रामेश्वर नाईक यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी यांच्याकडून रामेश्वर नाईक यांच्या नियुक्तीचे पत्र जारी करण्यात आले आहे. रामेश्वर नाईक यांच्याकडे यापूर्वी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी होती. धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांना मदत मिळवून देण्यात रामेश्वर नाईक यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाच्या प्रमुखपदाचा कारभार सोपवण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना जनसामान्यांचा नेता म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण होण्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाचा मोठा वाटा होता. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी अनेक गरजू रुग्णांवर मोफत उपचाराची सोय केली होती. यामध्ये मंगेश चिवटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अगदी सोमवारी रात्री झालेल्या कुर्ला बस अपघातानंतरही मंगेश चिवटे तातडीने कामाला लागल्याचे दिसून आले होते. मंगेश चिवटे यांनी रुग्णालयात जाऊन कुर्ला अपघात प्रकरणातील जखमींची विचारपूस केली होती. या सगळ्यामुळे मंगेश चिवटे यांनी स्वत:चेही एक वेगळे स्थान निर्माण केले होते. एकनाथ शिंदे यांचा विश्वासू आणि खास मर्जीतील व्यक्ती म्हणून मंगेश चिवटे हे ओळखले जात होते. अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे यांच्या उपोषणावेळी मंगेश चिवटे यांनी मध्यस्थाची भूमिकाही बजावली होती. मंगेश चिवटे हे अनेकदा एकनाथ शिंदे यांचा संदेश घेऊन मनोज जरांगे यांच्याकडे जायचे. मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण मागे घेण्यासाठी ज्या वाटाघाटी झाल्या होत्या, त्यामध्ये मंगेश चिवटे यांचा सहभाग होता. त्यामुळे अल्पावधीत प्रशासनात मंगेश चिवटे हे नाव प्रसिद्ध झाले होते. मात्र, आता त्यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाचे प्रमुखपद काढून घेण्यात आले आहे. हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा झटका असल्याची चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा कक्ष म्हणजे रुग्णसेवा कक्षाकडे पाहिले जाते. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात या कक्षाला महत्त्व आले होते. गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांनी मुख्यमंत्री साहायता निधीच्या माध्यमातून रुग्णसेवा कक्षाचे काम प्रभावीपणे केले होते. देवेंद्र फडणवीसांच्या पहिल्या टर्ममध्ये ओमप्रकाश शेट्ये यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी होती. तर रामेश्वर नाईक यांच्याकडे गेल्या टर्ममध्ये उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी होती.