परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा ‘या’ निर्णयासह जमावबंदीचे आदेश..!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
परभणी :- “परभणीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तकेच्या विटंबनेच्या प्रकरणात आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, या हाकेला हिंसक वळण लागलं असून आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर बंद दुकानांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे.
तसेच पोलिसांच्या गाडींवर ही दगडफेक करण्यात आली, काही गाड्यांची मोडतोडही आंदोलकांकडून करण्यात आली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी (Police) ॲक्शन घेत, या आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळाले. तसेच शहरांमध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुपारपर्यंत शांततेत सुरू असलेल्या या बंदला अचानक हिंसक वळण लागल्याने या प्रकरणी परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे.
पुढील आदेश येईपर्यंत ही जमावबंदी लागू
परभणी बंदच्या हिंसक वळणावर परभणीचे जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शहरात जमावबंदीचे आदेश काढले आहे. परीसारत 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. आज दुपारी 1 वाजेपासून ते पुढील आदेश येईपर्यंत ही जमावबंदी लागू राहणार आहे. तसेच सर्व टेलीफोन, एसटीडी, भ्रमणध्वनी, आयएसडी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स केंद्र, ध्वनीक्षेपके आणि इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे ही आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलक आणि आंबेडकरी चळवळीतील नेत्यांशी संवाद साधत शांततेचही आवाहन केलं आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा कार्यालयाची महिलांकडून तोडफोड
परभणीत रस्त्यांवर जाळपोळ आणि दगडफेक झाल्यानंतर आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयात संतप्त जमावाने तोडफोड केली आहे. यातील काही आंदोलक महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या आणि या महिलांनी कार्यालयातील काचा, दरवाजे, टेबल खुर्च्यांची तोडफोड केली आहे. काही वेळापूर्वी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि इतर आंदोलकांची बैठक घेऊन शांतता राखण्याचं आवाहन केलं होतं. दरम्यान ही घटना घडल्याने हे प्रकरण अधिक चघळल्याचे बघायला मिळाले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नेमक्या काय सूचना?
ज्याअर्थी, परभणी शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीचे एका इसमाने नुकसान केल्याने जमावाने शहरात तणाव निर्माण केला असल्यामुळे परभणी शहरात ताण-तणावाचे वातावरण तयार झाले आहे. लोक गटा-गटाने येउन पुतळ्याच्या बाजूस येउन घोषणाबाजी करीत आहेत. तसेच त्याबाबतचे व्हिडीओ प्रसारीत करीत आहेत. जिल्हयात कलम 37 (1) (3) प्रमाणे जमावबंदी आदेश लागु असतानासुध्दा सदरील आदेशास न जुमानता आंदोलनास पाठींबा देण्यासाठी परभणी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळया शेजारी मोठ्या प्रमाणात जमाव जमून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील कालावधीत शहरात, व जिल्हयात तणावाचे वातावरण निर्माण होवू नये म्हणून परभणी शहर व जिल्हयात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163 लावणे बाबत पोलीस अधिक्षक, परभणी यांनी विनंती केली आहे.
त्याअर्थी, मी. रघुनाथ गावडे, जिल्हादंडाधिकारी परभणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 मधील प्राप्त अधिकाराचा वापर करुन परभणी शहर व जिल्हयामध्ये सार्वजनिक ठिकाणी पाच व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास प्रतिबंध करीत आहे. तसेच सर्व टेलीफोन, एसटीडी, भ्रमणध्वनी, आयएसडी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके व इंटरनेट सेवा बंद ठेवणे बाबत आदेशीत करीत आहे. हे आदेश कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना लागू राहणार नाहीत.
हे आदेश दिनांक 11.12.2024 रोजी दुपारीचे 13.00 वाजे पासून पुढील आदेशा पावेतो लागु राहतील. तसेच प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्याने हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्द करावे असेही आदेशीत करीत आहे. सदरचे आदेश दिनांक 11.12.2024 रोजी माझे सही व शिक्यानिशी निर्गमित करण्यात येत आहे.