अपक्ष उमेदवारांच्या प्रचार रॅलीदरम्यान अपक्ष उमेदवारावर गोळीबार ; मुक्ताईनगर मतदारसंघातील घटना….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुक्ताईनगर :- “जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघात चुरशीची लढाई पाहण्यास मिळणार आहे. मात्र मतदारसंघात प्रचाराला सुरवात झाल्यानंतर खळबळजनक घटना घडली असून मुक्ताईनगर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्या प्रचार रॅली दरम्यान गोळीबार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीत अर्ज माघारी झाल्यानंतर बहुतांश उमेदवारांनी आज प्रचाराचा नारळ फोडला आहे. त्यानुसार मतदारसंघात प्रचार करण्यास सुरवात केली आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभेच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधलेले आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार असलेले विनोद सोनवणे हे आज बोदवड तालुक्यातील शिरसाळा मारुती येथे प्रचाराचा शुभारंभ करून ते तालुक्यातील राजुरा येथे प्रचारासाठी निघाले असता त्यांच्या ताफ्यावर अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
प्रचाराचा आजपासून शुभारंभ झाला असताना अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे हे बोदवड तालुक्यातील शिरसाळा मारुती येथे प्रचाराचा शुभारंभ करून ते तालुक्यातील राजुरा येथे प्रचार रॅलीसाठी निघाले होते. प्रचार रॅली जात असताना अज्ञात हल्लेखोर दुचाकीवरून येत त्यांनी गोळीबार केला. सुदैवाने त्यांच्या गाडीवरून गोळ्या निघून गेल्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणी पोलिसांकडून आता तपास करण्यात येत आहे.