नागरिकानो,अफवांवर विश्वास ठेवू नका ; 140 क्रमांकाबाबतच्या संदेशात तथ्य नाही
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई पोलिसांचा संदेश आहे, 140 क्रमांकाने सुरु होणारे फोन घेऊ नयेत, बँक खाते रिकामे होईल” अशा फॉरवर्ड मेसेजने सर्वसामान्य नागरिकांमध्ये गोंधळ उडविला आहे. मात्र, हा संबंधित मेसेजमध्ये तथ्य नसुन तुमचे बँक खाते किंवा डेबिट/क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती इतरांना दिल्याशिवाय तुमच्या बँक खात्याला कसलेही नुकसान नाही”,असे महाराष्ट्र सायबर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
मागील काही दिवसांपासुन एक पोलिस कर्मचारी नागरिकांना 140 क्रमांकाने सुरु होणारे फोन घेऊ नयेत, असे आवाहन करत असल्याचा व्हिडिओ व्हॉट्सअप, फेसबुक व अन्य सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओ समवेतच “140 या अंकाने सुरुवात होणाऱ्या अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन कॉल रिसीव्ह केला तर, आपल्या खात्यातील सर्व पैसे काढले जाऊन अकाउंट शून्य होते” असा मेसेज देखील मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड केला जात होता.त्यामुळे नागरीकांमध्येही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, महाराष्ट्र सायबर पोलिसांनी संबंधीत व्हिडिओ व मेसेजचा शोध घेतला. त्याचबरोबर लोकांमध्ये निर्माण झालेला गोंधळ कमी करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले. त्यानुसार, संबंधीत मेसेजमध्ये कोणतेही तथ्य नसून जोपर्यंत आपण, बँक अकाउंट डिटेल्स, ओटीपी अथवा क्रेडिट कार्ड / डेबिट कार्डचे पूर्ण नंबर तसेच सी. व्ही. व्ही./ पिन नंबर शेअर करीत नाही तोपर्यंत आपल्या बँक खात्याला कसलेही नुकसान होऊ शकत नाही, हे नागरीकांनी लक्षात घ्यावे, असे आवाहन महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी केले.
आपल्याला 140 ने सुरुवात होणाऱ्या क्रमांकावरून फोन आला तर घाबरु नये. संबंधीत क्रमांक हे टेलिमार्केटिंगसाठी दिलेले असतात. परंतु हे देखील लक्षात ठेवावे की, अशा किंवा इतर कोणत्याही क्रमांकावरून फोन आल्यास व ओटीपीसह आपली वैयक्तिक माहिती, बँक डिटेल्स, डेबिट/ क्रेडिट कार्ड डिटेल्स जर कोणी विचारत असेल तर आपण आपली कोणतीही वैयक्तिक माहिती, बँक खात्याची माहिती, डेबिट/ क्रेडिट कार्डची माहिती अथवा पिन नंबर/ ओटीपी देऊ नये किंवा दिला जाणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी, असे आवाहनही महाराष्ट्र सायबर पोलिसांनी केले आहे.