दहावी व बारावीच्या निकालांबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर
अनेक दिवसांपासून राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चेला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अखेर पूर्णविराम लावला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्डाचा निकाल 31 जुलैपर्यंत तर बारावी बोर्डाचा निकाल 15 ते 20 जुलै दरम्यान जाहीर केला जाईल, अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली.त्यांच्या या घोषणेमुळे राज्यातील लाखो विद्यार्थी पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालासंदर्भात सध्या अनेक अफवा पसरत आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर करण्यात येतात. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे निकाल उशिराने लागणार आहेत. त्यामुळे नेमकं हे निकाल कधी लागतील, याकडे विद्यार्थी पालकांबरोबरच कॉलेजांचेदेखील लक्ष लागून राहिले आहे. अखेर या प्रश्नी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी लवकरच निकाल जाहीर होण्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार येत्या 15 ते 20 जुलै दरम्यान बारावी बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात येणार असून दहावी बोर्डाचा निकाल 31 जुलै पर्यंत जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड हे हिंगोली दौऱयावर असताना त्यांनी ही घोषणा केली आहे.
दरम्यान, राज्य शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वीच अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा श्रीगणेशा केला आहे. त्यानुसार लवकरच विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष दहावी बोर्डाच्या निकालाकडे लागून राहिले आहे. या निकालानंतर सर्व प्रवेश प्रकिया राबविण्यात येणार असल्याने निकाल वेळेवर लागणे गरजेचे असल्याचे मत शिक्षणतज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.