वनमंत्र्यांच्या जिल्ह्यातच वन कायद्याची पायमल्ली! लाखो रुपयांच्या सागवान चोरीत वरिष्ठ अधिकारी कारवाईतून मोकळे? अभयारण्यातील प्रकार
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
प्रशांत भागवत 9422867748 उमरखेड
उमरखेड तालुक्यातील पैनगंगा अभयारण्य अंतर्गत परिक्षेत्रातील सोनदाभी व एकम्बा वर्तुळा तील जंगलात गेल्या महिन्यात झालेल्या लाखो रुपयांच्या अवैध वृक्ष चोरीप्रकरणी वनरक्षका पासून दरोगा, वनपरिक्षेत्राधिकारी ते सहायक उपवनसंरक्षक अशा सर्वांची जबाबदारी निश्चित करीत त्यांचेवर कार्यवाही अपेक्षित असताना, याप्रकरणी केवळ संबंधित वर्तुळाच्या वनरक्षकास जुजबी नोटीस देऊन वरिष्ठांनी स्वतःची चमडी वाचविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दस्तुरखुद्द राज्याचे वनमंत्री तथा पालक मंत्री संजय राठोड यांच्याच जिल्ह्यात वनकायद्याची सर्रास पायमल्ली होत असल्याने, इतर ठिकाणी काय होत असेल? याबाबत कल्पनाच न केलेली बरी !
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पैनगंगा अभयारण्यातील उमरखेड परीक्षेत्रामध्ये येत असलेल्या, उत्तर एकम्बा नियत क्षेत्रात व सोनदाभी वर्तुळात मोठ्या प्रमाणात मौल्यवान सागवान वृृृक्ष चोरी झाल्याची तक्रार अमरावती येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी सदर तक्रारीची दखल घेत बिट निरीक्षण पथकाची नियुक्ती करून प्रत्यक्ष एकम्बा मोरसंडी सोनदाभी या परिसरातील जंगलाची प्रत्यक्ष पाहणी केली असता, परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वृृृृक्ष तोड झाल्याचे दिसून आले २५ जून रोजी केलेल्या पाहणीत एकम्बा वर्तुळातील क्रमांक ५६४व ५६५ मध्ये सागवानाची शंभर झाडे तोड झालेले आढळुन आले. याप्रकरणी जप्त केलेल्या मुद्देमालाची रक्कम वगळता एकटया एकम्बा वर्तुळात एक लाख ५८ हजार ६३२ रुपयांचे नुकसान झाल्यांचा अहवाल तयार करून तसा प्राथमिक वन गुन्हा ही नोंद घेण्यात आला. त्याचबरोबर सोनदाभी रेंज मध्ये देखील अशाच प्रकारे मोठी वृक्ष तोड झाल्याचे स्पष्ट झाले.
अवैध वृक्षतोडीबाबत कार्यवाही चे निकष ठरविताना, वनविभाग विशेषतः वन्यजीव विभागाचे वनसंरक्षण बाबत १९८१-८२ परिपत्रकानुसार कठोर नियम बनविण्यात आले आहेत. त्यामध्ये नुकसान झाल्याची रक्कम व त्याप्रमाणात दोषी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही अपेक्षित आहे. पंचवीस हजारापर्यंत नुकसान झाल्यास त्यात परिक्षेत्र अधिकारी जबाबदार धरण्यात येतो. पुढे एक लाख रुपयापर्यंत नुकसान झाल्यास सहाय्यक वनसंरक्षक यांची जबाबदारी निश्चित करण्यात येते.एकंबा व सोनदाभी रेज मधील अवैध वृृृृक्षतोडीचा आकडा तीन लाखाचे वर गेला तरी केवळ वनरक्षकास जुजबी नोटीस देवुन या अवैध वृृृक्ष तोडीवर पांघरून घालण्याचा प्रकार पांढरकवडा येथील वन्यजिव विभागातील वरीष्ठ अधिकार्यांनी चालविला आहे.
महा विकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात पहिल्यांदा राज्याचे कॅबिनेट मंत्री पद जिल्ह्याला लाभले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वनविभागाचा भ्रष्ट चेहरा बदलून वनखात्याला लकाकी देण्याचे काम वनमंत्री करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात होती .परंतु जिल्ह्यातील भ्रष्ट वनाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना हरताळ फासण्याचे आपले काम सुरू ठेवले असून, वृक्षरोपण व अवैध वृक्ष तोड या प्रकरणात लाखो रुपयांचा मलिदा लाटण्याचे प्रकार सुरूच ठेवल्याने वनमंत्री संजय राठोड भ्रष्ट वन अधिकाऱ्यांविरुद्ध काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.