वृक्ष लागवड करून वनमहोत्सव कार्यक्रमाचा शुभारंभ
वृक्ष लागवड करून वनमहोत्सव कार्यक्रमाचा शुभारंभ
यवतमाळ, दि. 1 : यवतमाळ वनविभागाअंतर्गत जांब येथील जैव विविधता उद्यान येथे वृक्ष लागवड करून ‘वनमहोत्सव-2020’ या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
कोविड-19 या विषाणूचा संसर्ग लक्षात घेता, या ठिकाणी जास्त गर्दी होणार नाही ही बाब लक्षात घेऊन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदा पवार, नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा आदींनी वेगवेगळ्या वेळेत उपस्थित राहून वृक्षारोपण केले. यावेळी बांबू लागवडीचे महत्व सर्वांपर्यंत पोहचावे या उद्देशाने 400 बांबूची रोपे आणि 100 मित्र प्रजातींची रोपे लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाला उपवनसंरक्षक डॉ. भानूदास पिंगळे, विभागीय वन अधिकारी श्री तोरो, सहाय्यक वनसंरक्षक श्री अर्जूना, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी आदींनी वेगवेगळ्या वेळेत येथे रोपांची लागवड केली. यावेळी मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियाना अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्षरोपण
स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या कार्याच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्ष लागवडीचा कार्यक्रम वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियानाची सुरूवात दिनांक 1 जुलै 2020 रोजी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथील गार्डन मध्ये वृक्ष लागवड करून करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, नायब तहसिलदार प्रकाश खाटीक, कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.
००००