आठ राज्यांमधील राज्यसभेच्या १९ जागांसाठी आज मतदान
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विशेष प्रतिनिधी :
जगभरात थैमान घालणारा करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात वाढत असतानाच, दुसरीकडे राज्यभा निडणुकीचा बिगुल कधीच वाजला व आज देशभरातील आठ राज्यांधील १९ जागांसाठी राज्यसभेची निवडणूक पार पडत आहे. दरम्यानच्या काळात आमदारांच्या फोडाफोडीमुळे देशातील राजकीय वातावरण गरम झाल्याचे दिसून आले. भाजपा व काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागल्याचे दिसत आहे.
मध्य प्रदेशमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. भाजपा व काँग्रेसने प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले आहेत. तर, गुजरातमधील चार जागांसाठी पाच उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या ठिकाणी भाजपाकडून तीन उमेदवार तर काँग्रेसकडून दोन उमेदवारांना रिंगणात उतरवण्यात आले आहे.
राज्यस्थानमध्ये राज्यसभेच्या तीन जागा असून चार उमेदवार निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस व भाजपाने प्रत्येकी दोन उमेदवारांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले आहे. दुसरीकडे झारखंडमधील राज्यसभेच्या दोन जागांसाठी तीन उमेदवार निवडणूक लढवत आहेत. जेएमएम, भाजपा आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी प्रत्येकी एक उमेदवार दिलेला आहे. आंध्रप्रदेशच्या चार जागांसाठी पाच उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
पूर्वोत्तरमधील मणिपूर, मेघालय आणि मिझोरम येथील राज्यसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी देखील आज निवडणूक पार पडत आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आमदारांच्या बंडखोरीमुळे राज्यसभेच्या दोन जागा जिंकण्याचे काँग्रेसचे गणित बिघडल्याचे दिसत आहे. बुधवारी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेल्या डिनर पार्टीत बसपा, सपा आणि अपक्ष आमदारांच्या उपस्थितीने भाजपा आमदारांच्या विजयाचा मार्ग अधिकच सुकर झाल्याचे दिसत आहे.
तर दुसरीकडे मध्य प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत जवळपास सहा आमदारांच्या अनुपस्थितीमुळे काँग्रेसवरील संकट अधिकच गडद झाले. मध्य प्रदेशमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. भाजपाकडून ज्योतिरादित्य सिंधिया आणि सुमेर सिंह सोलंकी तर काँग्रेसकडून दिग्विजय सिंह व फूल सिंह बरैया यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
गुजरातमध्ये काँग्रेसने शक्ती सिंह गोहील यांना प्रथम उमेदवार बनवून त्यांचा मार्ग सुकर केल आहे. मात्र भरत सिंह सोलंकी यांना विजयी होण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावावी लागणार आहे.
झारखंडमध्ये अटीतटीची लढत होणार आहे. आमदारांच्या संख्येनुसार जेएमएमचे शिबू सोरेन यांची एक जागा निश्चित आहे. तर, दुसऱ्या जागेसाठी काँग्रेस व भाजपामध्ये लढत आहे. दोन्ही पक्ष आमदरांची जमावाजमव करताना दिसत आहेत.
राज्यस्थानमध्ये तीन जागांसाठी निवडणूक होत आहे. काँग्रेसने वेणुगोपाल आणि नीरज डांगी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर भाजपाकडून राजेंद्र गहलोत आणि ओंकार सिंह लखावत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणी काँग्रेसचा मार्ग सुकर वाटत आहे, मात्र भाजपाने दुसरा उमेदवार देत डाव उलटवण्याचे संकेत दिले आहेत.