महायुती व महाविकास आघाडी अंतर्गत संघर्ष विकोपाला ; निवडणुकीत “मतदार राजा” मात्र दुर्लक्षित….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- नेत्यांच्या अतिमहत्वाकांक्षा आणि आम्ही कसे पक्षाचे एकनिष्ठ हे दाखविण्याच्या स्पर्धेत महायुती आणि महाविकास आघाडीत राज्यातील जागांचा अंतिम निर्णय झाला नाही.
या सर्व घडामोडीत दोन्ही आघाड्यांचे मतदारांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. अशा परिस्थितीत मतदार महायुती आणि महाविकास आघाडीला धडा तर शिकविणार नाही ना, अशी शंका उपस्थित होते. जागा वाटप सुरु आहे, चर्चा सुरु आहे, येत्या दोन दिवसात घोषित करु, आमच्यात काही मतभेद नाही, जागा वाटप अंतिम टप्प्यात, आज सर्व जागा वाटप जाहिर करु या सर्व पोकळ चर्चांना महाराष्ट्रातील मतदार कंटाळला आहे. त्यामुळे आता थेट मतदानाच्या दिवशी या नेत्यांना धडा शिकविण्याची तयारी मतदारांनी सुरु केली आहे. निवडणुकीत मतदार हा राजा असताना त्याच्याकडे फोकस नाही. तो फोकस नेत्यांकडे वळला असुन तुर्तास मतदार राजा नेते येतील आणि आम्हाला वचन देतील अशा याचकाच्या अवस्थेत आहे. नेत्यांवरचा सर्वाधिक फोकस मतदारांना जास्त रुचत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा दुर्लक्षित मतदार या निवडणुकीत कोणाला मतदान करणार हे पाहण्यासारखे असेल.
महायुतीची चर्चा अंतिम टप्प्यात म्हणता म्हणता भाजपने काही जागांची घोषणा केली. आणि दूसरीकडे शिवसेना व राष्ट्रवादीला गृहित धरले. शिवसेनेच्या 13 खासदारांपैकी तिघांचे तिकिट कापवे लागणार, असा इशारा महाशक्तीने दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाचे खासदार अस्वस्थ आहे. त्यांच्या पैकी नेमके कोणाचे तिकिट कापले जाणार हे निश्चित नाही. ज्यांचे कापले जाणार त्यांच्या पुनर्वसन प्लॅन भाजपने सादर केला नाही. त्यामुळे भाजप च्या एकाधिकारशाही समोर शिवसेनेचे नेते गप्प गुमान पदरात जे पडते ते घेण्याच्या मनस्थितीत आहे. अशीच काय ती परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस ची आहे. त्यांना चार ते सहा जागांवर घड्याळ चिन्हांवर उमेदवार उभे करता येतील. त्यात राष्ट्रवादीला स्वपक्षीय जुन्या नेत्यांसोबत संघर्ष करावा लागणार आहे. हा संघर्ष लोकसभा निवडणुकीत करावा लागू नये, यासाठीच भाजप ने राष्ट्रवादी फोडली होती काय ? असा प्रश्न या निमित्त उपस्थित होतो. ज्या ठिकाणी विजयाची शक्यता नव्हती, त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा मतदार संघात आपसात निवडणुक लढविण्यात भाजप तरबेज आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुट पथ्यावर पडली आणि शिवसेनेचे थेट खासदारच भाजपच्या गळाला लागले. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपने मोठा भाऊ असे मिरविणे सुरु केले आहे. हे सर्व करताना भाजपे त्यांच्यासाठी सोयीच्या सर्व जागा स्वतःच्या ताब्यात ठेवल्या. शिवसेनेच्या काही जागांवर दावा करत त्या ही भाजप हस्तगत करणार आहे.
डबल इंजिन सरकार, मोदींची गॅरंटी, 400 पार चा नारा, विधानसभा निवडणुकीचे चाॅकलेट, राज्यात पुन्हा सरकार आले तर मंत्री पद, एखादे दूसरे केंद्रात मंत्री पद, अशी अनेक प्रलोभने भाजप नेते शिवसेना आणि राष्ट्रवादी गटाला अगदी सहज वाटत फिरत आहे. त्यातुन राज्यातील काही मतदार संघावर भाजप ने भक्कम दावा केला आहे. विशेषतः शिवसेनेच्या काही विद्यमान खासदारांना यातुन डच्चु दिला जाणार आहे. तिकिट कापल्यानंतर हे खासदार चुप बसले तर ठिक नाही तर, त्यांच्या जुन्या बंद फाईल्स केव्हाही खुल्या करण्याचे जुनेच तंत्र सत्तापक्षाला आत्मसाद आहे. त्यामुळे महायुतीच्या कितीही नेत्यांनी विशेषतः शिवसेनेच्या नेत्यांनी ओरड केली तरी, भाजपला हवा असलेला लोकसभेचा मतदार संघ ते घेतील. त्यात कुठे ही सामंजस्य राहणार नाही. त्यात मनसे ला एक – दोन जागा देण्याचा भाजप चा प्रयत्न म्हणजे दूसऱ्याच्या जागा तिसऱ्याने मोठे मन करत दान देण्याचा उद्योग असल्याची चर्चा महायुतीत आहे. महायुतीत सामंजस्य असते तर आता पर्यंत राज्यातील जागा वाटप झाले असते आणि मतदारांना कडे महायुतीच्या नेत्यांनी लक्ष दिले असते. पण, केवळ मतदारांना गृहित धरत महायुतीचे नेते जागा वाटपाचा तिढा अंतिम क्षणापर्यंत कायम ठेवण्यात यशस्वी होताना दिसत आहे. यातुन ज्या खासदारांचे तिकिट कापले जाणार आहे त्यांना अंतिम क्षणापर्यंत गाफिल ठेवण्याचा उद्योग होत आहे.
दूसरीकडे आमच्यात वाद नाही. तुम्ही सर्व जागा लढा आम्ही बाहेरुन पाठिंबा देतो, असे म्हणत काँग्रेसने शिवसेनेच्या नेत्यांना चांगेलच धारेवर धरले आहे. महायुती प्रमाणे महाविकास आघाडीत लोकसभा जागा वाटपावरुन जोरदार वाद आहे. यात वंचित नेत्यांनी महाविकास आघाडीला जेरीस आणले आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित आणि महाविकास ची आघाडी होण्याची सुतराम शक्यता नाही. लोकसभा निवडणुकीत या विभाजनाचा फायदा हा महायुतीला होण्याची चिन्हं आहेत. महाविकास च्या सोबत वंचित आल्यास मतांचे विभाजन टाळता येईल. पण, तसे होण्याची शक्यता आंबेडकर यांच्या अस्थिर स्वभावामुळे शक्य नाही.
महाविकास मध्ये फक्त वंचित नेत्यांची महत्वाकांक्षा आड येत नाही तर शिवसेना नेत्यांची महत्वाकांक्षा आणि स्वभाव आडकाठी आणत आहे. वंचित प्रमाणे शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाची स्थिती आहे. त्यांना राज्यात 23 जागा पाहिजे होत्या. पण, इतक्या जागा देण्यास काँग्रेस सकारात्मक नाही. त्यामुळेच महाविकास आघाडीत शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, काँग्रेस नेत्यांनी शिवसेना नेत्यांना या पुढील चर्चा हायकमांड सोबत दिल्लीत करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे जागा वाटप उद्याच जाहिर होणार, आमच्यात वाद नाही हे नाना पटोले यांच्या वक्तव्याने यंदा विक्रम मोडल्याचे चिन्हं आहे. सांगली प्रमाणे इतर काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काही मतदार संघात उमेदवारांसाठी घोषित करत बाजी मारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील संघर्ष आता विकोपाला गेल्याचे चित्र आहे.
महायुतीप्रमाणे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे देखील मतदारांकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदार राजा दुर्लक्षित ठेवत नेते मात्र चर्चा, बैठका आणि हाॅटेल मध्ये चैन करण्यात व्यस्त आहे. फाईव्ह स्टार हाॅटेल च्या बैठकामध्ये व्यस्त नेत्यांना राज्यातील लोकांच्या समस्या, मतदारांचे मुद्दे विस्मृतीत गेल्याचे चित्र आहे. अनेक मतदार संघात सर्वच पक्षांचा दबदबा आहे. प्रत्येक ठिकाणी नेत्यांचा जिंकण्याचा भक्कम दावा आहे. निवडणुकीत जिंकण्याचे हे दावे – प्रतिदावे पाहता जिंकणाऱ्या उमेदवारांची फुगलेली संख्या लक्षात घेता राज्यातील लोकसभा मतदार संघ कमी पडतात की काय, अशी भिती व्यक्त केली जात आहे.
मुद्यांच्या आधारावर लोकसभा निवडणुक न राहता केवळ राजकीय पक्ष, महायुती व महाविकास आघाडीत नेत्यांचे हेवेदावे यावर लोकसभा निवडणुकीचा महत्वाचा वेळ खर्च होत आहे. पहिल्या टप्प्यात निवडणुक होत असलेल्या मतदार संघात उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. असे असताना अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीचा संयुक्त जाहिरनामा बाहेर आला नाही. त्यांचे लोकसभा निवडणुकीतील वचननामे धुळखात पडले आहे. मतदारांना गृहित धरण्याचा राज्यातील राजकीय नेत्यांचा प्रयत्न गंभीर आहे. केवळ जागावाटपाचे गुऱ्हाण सुरु ठेवला जात आहे. लोकशाहीतील सर्वात मोठ्या उत्सवात मतदारांना मुद्यांसाठी आश्वासनांसाठी वाट पहावी लागत आहे. मतदारांना उमेदवारांच्या प्रतिक्षेत ठेवणे.
मतदारांना गृहित धरत ‘राज्यात फक्त आम्ही जिंकणार’ असा अहंभाव नेत्यांमध्ये गेला तर नाही ना अशी भिती व्यक्त होत आहे. या पण, लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदार संघात जिंकण्यासाठी मतदार हा महत्वाचा आणि एकमेव मुख्य घटक आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते मात्र मतदारांना विसरले आहे. अशा परिस्थितीत राजकीय नेत्यांचा,पक्षांचा विसर मतदारांना पडण्याची भिती आहे. वाढत्या उन्हामुळे कमी मतदानाची टक्केवारी ही केवळ राज्यात नाही तर देशात राजकीय भुकंप घडवु शकते.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….