राज्यपालांच्या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरेची दांडी; तर सोनिया गांधीच्या बैठकीत होणार सहभागी!
भाजपच्या राजकारणाला सूचक उत्तर
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
करोना संकटाला तोंड देण्यात राज्य सरकार अपयशी ठरत असल्याची तक्रार करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मंगळवारी भेट घेतल्यानंतर कोश्यारी यांनी तातडीने बुधवारी करोनाविषयक आढावा बैठक बोलावली. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या बैठकीकडे पाठ फिरवत करोनावरून सुरू झालेल्या राजकारणाला सूचक उत्तर दिले.राज्यातील करोना आव्हानाचा आढावा घेण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी रात्री आढावा बैठक बोलावली. या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही बोलावण्यात आल्याचे राजभवनच्या सूचनेवरून स्पष्ट झाले होते. मात्र, प्रत्यक्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या बैठकीस गेलेच नाहीत. इतकेच नव्हे तर महाविकास आघाडी सरकारच्या एकाही मंत्र्याने या बैठकीस उपस्थिती लावली नाही. तसेच मुख्यमंत्री कार्यालयातील सनदी अधिकारीही या बैठकीस उपस्थित राहणार नाहीत याची व्यवस्था करण्यात आली.
बैठकीला दांडी मारत राजभवन-भाजप यांच्यामार्फत होणाऱ्या राजकारणाला ठाकरे यांनी सूचक उत्तर दिले. शिवाय आपले स्वीय सहायक व शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना त्या बैठकीला पाठवत, तेथील घडामोडींवर आपली नजर राहील, अशी व्यवस्था के ली.
विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवर्जून राज्यपालांकडे जाऊन त्यांची भेट घेत राजकीय शिष्टाचाराचे पालन के ले. पण भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून राजभवन बैठक लावत असेल तर त्या राजकारणाला प्रत्युत्तर देऊ असेच ठाकरे यांनी यातून दाखवून दिल्याचे मानले जाते.राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, सीतराम कुंटे, मनोज सौनिक, नितीन करीर व प्रदीप व्यास, मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल तसेच शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. येत्या जून व जुलै महिन्यातील करोनाबाधितांची संभाव्य संख्या विचारात घेऊन संपूर्ण राज्यात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची सूचना राज्यपालांनी या वेळी केली. करोना संकटाचा मुकाबला करताना बिगरकरोना रुग्णांची गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घेण्याची सूचना राज्यपालांनी या वेळी केली. राज्यात एकूण वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, आरोग्यसेवक, रुग्णालयातील उपलब्ध खाटा यांची एकत्रित माहिती देणारा ‘डॅशबोर्ड’ तयार करण्यासही कोश्यारी यांनी सांगितले.
सोनिया गांधींच्या बैठकीत सहभागी होणार..
करोनाचे संकट व टाळेबंदीमुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शुक्रवारी बोलावलेल्या देशातील विरोधी पक्षांच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत.
👉दूरचित्रसंवादाद्वारे ही बैठक होणार असून मुख्यमंत्री ठाकरे हे मुंबईतून सहभागी होतील. देशातील करोना रुग्णांची संख्या वाढतच असून केंद्र सरकारने टाळेबंदीचा चौथा टप्पा जाहीर केला आहे. देशभरात गरिबांचे प्रचंड हाल होत असून आपल्या राज्यात परतणाऱ्या लाखो मजुरांच्या हालअपेष्टांचे चित्र समोर येत आहे. या पाश्र्वभूमीवर देशातील परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक शुक्रवारी दुपारी तीन वाजता आयोजित केली आहे.
👉 दूरचित्रसंवादाद्वारे होणाऱ्या या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दक्षिण भारतातील पक्ष सहभागी होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही या बैठकीस उपस्थित राहतील, असे समजते.