फडणवीस सरकारने कर्जाचा डोंगर वाढविल्यानेच मदत करता येईना : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
पॉलिटिक्स स्पेशल लाइव्ह
हातावरील पोट असलेल्या राज्यातील दीड कोटी लोकांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याची मागणी माझ्यासह बहूतांश मंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी सुमारे ७ हजार ५०० कोटी रुपये लागणार आहेत. परंतु, फडणवीस सरकारने राज्यवरील कर्जाचा डोंगर वाढवून ठेवल्याने राज्याची सद्यस्थिती पाहता मदतीसाठी एवढे पैसे उपलब्ध नाहीत. तरीही हातावरील पोट असलेल्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार कर्ज काढेल, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
कोरोनाच्या संकटामुळे २२ मार्चपासून राज्य लॉकडाऊन आहे. हातावर पोट असलेल्या चांभार, कुंभार, न्हावी अशा लघू व्यावसायिकांसह रिक्षावाले, बांधकाम मजूर, विडी कामगारांची चिंता वाढली आहे.अडचणीतील या दीड कोटी लोकांना राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर अशा लोकांना राज्य सरकारने प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याची मागणी मंत्रिमंडळातील बहूतांश मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यानुसार याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारने संबंधितांना दिल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.
”त्यासाठी साडेसात हजार कोटी रुपयांची गरज आहे. मात्र, मागील सरकारने राज्याच्या डोक्यावर चार लाख 75 हजार कोटींहून अधिक कर्जाचा डोंगर करुन ठेवल्याने राज्य सरकारकडे तेवढा पैसा सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे कर्ज काढून अशा लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल,” अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी दिली.
मुश्रीफ म्हणाले, ”राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढत असताना दुसरीकडे हातावरिल पोट असलेल्यांसह शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारकडे पुरेशा प्रमाणात पैसे उपलब्ध नाहीत. तरीही तत्कालीन फडणवीस सरकारने मेट्रो प्रकल्पासह अनावश्यक तथा तातडीने गरजेचे नसलेल्या प्रकल्पांवर हजारो कोटी रुपयांचा खर्च केला. त्यामुळे सध्याच्या या संकट काळात मदत करण्याची इच्छा असतानाही राज्य सरकारला अडचणींचा सामना करावा लागत आहे,”
”मेट्रो प्रकल्पाची सध्या 40 ते 50 टक्क्यांहून अधिक कामे झाली असल्याने ते प्रकल्प रद्दही करता येत नाहीत, अन्यथा असे प्रकल्प रद्द करून शेतकऱ्यांसह गोरगरिबांना मदत करता आली असती. दुसरीकडे जीएसटीसह अन्य परताव्याची रक्कम केंद्र सरकारकडून मिळाली नसल्याने राज्य सरकारला अडचणींचा सामना करावा लागत आहे,” असे मुश्रीफ म्हणाले.
”कोरोना या विषाणूचा सामना करत असताना राज्य 22 मार्चपासून लॉकडाउन आहे. 56 दिवस झाले राज्यातील लघू व्यावसायिकांसह हातावरील पोट असलेल्या व्यक्तींना काम मिळालेले नाही. त्यांना सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील दीड कोटी लोकांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय विचाराधिन असून त्यासाठी सरकार कर्ज काढेल. हातावर पोट असलेले न्हावी, चांभार, कुंभार, रिक्षावाले, बांधकामासाह व अन्य क्षेत्रातील कामगारांना तत्काळ मदत केली जाणार आहे,” असेही मुश्रीफ म्हणाले.
”फडणवीस सरकारने राज्यावर तब्बल पावणेसहा लाख कोटींच्या कर्जाचा बोजा करून ठेवला आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात अनेकांना मदत करण्याची इच्छा असतानाही सरकारला अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोदी सरकारचे 20 लाख कोटींचे पॅकेजमधून गोरगरिबांना मदत मिळणार नाही तर त्यांना कर्ज काढून त्यांचा संसार सावरावा लागणार आहे,” अशी टिका त्यांंनी केली.