इंडिया आघाडीत बैठकीआधीच रुसवेफुगवे ; अखिलेश यादव नाराज, ममता बॅनर्जींची असमर्थता…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी पक्षांची इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक बोलवली आहे. ६ डिसेंबरला दिल्लीत विरोधी पक्षांचे नेते एकत्र येणार आहेत. पाच राज्यांचे निकाल लागल्यानंतर विरोधी आघाडीची बैठक बोलावण्यात येईल, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यापूर्वी सांगितले होते.
तीन राज्यांतील काँग्रेसच्या पराभवानंतरची ही पहिलीच सभा आहे. त्यामुळे विरोधकांच्या या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याचदरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. नितीश कुमार आजारी असल्यामुळे बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. तर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव नाराज असल्याचे देखील संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे बैठकीआधीच इंडिया आघाडीत रुसवेफुगवे असल्याचं दिसून येत आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील इंडिया आघाडीच्या बैठकीत अनुपस्थित राहण्याचे संकेत दिले आहेत. ममता बॅनर्जी यांनी या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार देत ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. या बैठकीबाबत मला कोणीही सांगितले नाही किंवा मला फोन करूनही या संदर्भात माहिती देण्यात आली नाही. माझा उत्तर बंगालमध्ये ६ ते ७ दिवसांचा कार्यक्रम आहे. मी इतर योजना देखील केल्या आहेत. आता जर त्यांनी मला बैठकीसाठी बोलावले तर मी माझे कार्यक्रम कसे बदलता येईल?, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी असमर्थता दर्शवली आहे.
दरम्यान, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील जबरदस्त विजयामुळे २०२४च्या लोकसभा निवडणुकीद्वारे नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपद मिळवून देण्याची भाजपची सज्जता झाली आहे, तसेच या विजयानंतर रालोआतील घटक पक्षांसाठी आता भाजप म्हणेल तीच पूर्वदिशा ठरणार आहे. दुसरीकडे, मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे ‘इंडिया’ आघाडीच्या वाटाघाटीत काँग्रेसची क्षमता घटणार आहे. काँग्रेसचे वर्चस्व कमी झाल्यामुळे घटक पक्षांना हायसे वाटणार असले तरी काँग्रेसच्या सुमार कामगिरीमुळे त्यांचीही चिंता वाढली आहे.
इंडिया आघाडीच्या जागावाटप वाटाघाटीत आता असेल वेगळे चित्र
लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, आसाम, छत्तीसगड, हरयाणा, उत्तराखंड, हिमाचल या राज्यांमधील १५२ मतदारसंघांमध्ये काँग्रेस-भाजप थेट लढत होईल. शिवाय महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, पंजाब, दिल्ली या राज्यांतील २०२ मतदारसंघांत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल युनायटेड, राष्ट्रीय जनता दल, सपा, झामुमो, आप या मित्रपक्षांसोबत काँग्रेस उतरेल. काँग्रेसने भाजपविरुद्ध सरळ लढत होत असलेल्या मतदारसंघांमध्ये आपली संपूर्ण ताकद लावून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करावा आणि ‘इंडिया’ आघाडीत जागावाटपात अनावश्यक समस्या निर्माण करू नये, असे मत आता ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांचे नेते व्यक्त करीत आहेत.