घरपोच दारु विक्रीसाठी राज्य सरकारचं चांगभलं
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मद्यविक्रीची होम डिलिव्हरी करण्यास म्हणजेच घरपोच सेवा पुरवण्यास महाराष्ट्र सरकारने सशर्त संमती दिली आहे. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला. या काळात जीवनावश्यक सेवा वगळता सारी दुकानं बंद करण्यात आली. मात्र केंद्र सरकारने ३ मेनंतर दिलेल्या निर्देशांनुसार काही सेवा सुरु करण्यात आल्या. ज्यामध्ये मद्यविक्रीचा परवाना असलेली दुकानं उघडण्याची सशर्त संमती देण्यात आली. मात्र त्या अटींचं उल्लंघन होऊ लागल्याने मुंबई-पुणे आणि इतर शहरांमध्ये मद्यविक्री बंद करण्यात आली. आता राज्य शासनाने मद्याची घरपोच डिलिव्हरी देण्यासाठी सशर्त संमती दिली आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी १४ तारखेपासून मद्याची घरपोच सेवा देण्यास सुरुवात होईल अशी माहिती दिली आहे.मात्र यावेळी काही अटी आणि शर्थीही लागू करण्यात आल्या आहेत. फक्त परवाना असणाऱ्या मद्य दुकानांना ही सेवा देता येणार आहे. सोबतच ज्यांच्याकडे परमिट आहे त्यांनाच ही सेवा घेता येणार आहे. तसंच घरपोच सेवा देण्याची जबाबदारी मद्य दुकानाच्या मालकावर असणार आहे. याशिवाय डिलिव्हरी बॉयची वैद्यकीय तपासणी आवश्यक असणार आहे अशी माहिती कांतीलाल उमाप यांनी दिली आहे.
सोबतच डिलिव्हरीसाठी जाणाऱ्यांना ओळखपत्र दिलं जाणार आहे. डिलिव्हरी बॉयकडे ओळखपत्र असणं बंधनकारक असणार आहे. यासाठी मद्य दुकानदारांनी डिलिव्हरीसाठी पाठवण्यात येणाऱ्यांची माहिती देणं आवश्यक आहे. परमिट आणि ओळखपत्र तयार करण्यासाठी एक दिवस लागणार असल्यानेच १४ तारखेपासून ही सेवा सुरु करत असल्याची माहिती कांतीलाल उमाप यांनी दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परमिट ऑनलाइन मिळेल याची सुविधाही उपलब्ध असल्याचं कांतीलाल उमाप यांनी सांगितलं आहे.