शेतक-यांना खते व बियाणे थेट शेताच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचे दिग्रस कृषि विभागाचे नियोजन
ना.संजय राठोड यांच्या हस्ते उदघाटन
पुरुषोत्तम कुडवे ९३७०४६४८२४ पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिग्रस
राज्यात कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर संचारबंदी लागू आहे. अशा परिस्थितीत खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी कृषि सेवा केंद्रावर येऊन बियाणे, खते व किटकनाशकांची खरेदी केल्यास जास्त गर्दी होऊ शकते. आणि किमान अंतर न पाळल्या गेल्यामुळे कोरोना विषाणुंचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्व कृषि निविष्ठा ह्या थेट यांच्या शेताच्या बांधापर्यंत पोहोचविण्या बाबतचे नियोजन कृषी विभागा मार्फत करण्यात आले आहे. उपक्रमाचा शुभारंभ ना. संजय राठोड मंत्री वने व भूकंप पुनर्वसन महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जि.यवतमाळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलतांना मंत्री महोदयांनी उपक्रमाचे स्वागत करत मा.मुख्यमंत्री व कृषीमंत्री यांच्या संकल्पनेतून संपुर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमा बद्दल कृषि विभागाचे अभिनंदन केले. शासनाचा केंद्र बिंदु शेतकरी असल्याने खरीप हंगामात शेतकऱ्यांना सर्वेतपरी सहकार्य करण्याचे शासणाचे धोरण असल्याचे सांगितले.
जसे शेतकरी गटांमार्फत भाजीपाल्याचा पुरवठा शहरांमध्ये कृषि विभागाच्या संमन्वयाने करण्यात आला त्याच धर्तीवर गावपातळीवर कृषि निविष्ठांचा पुरवठा कृषि सेवा केंद्र आणि शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी यांचा समन्वय ठेऊन करण्यात येत आहे. या करिता कृषि सेवा केंद्र ते शेतकरी गट यांचा संमनवय , वाहतूक व इतर कामा करीता कृषि विभागातील क्षेत्रीय अधिकारी / कर्मचारी ग्राम पातळीवर समन्वयक म्हणून काम पाहत आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या भागात असलेल्या आणि त्यांना सोयीच्या आत्मा’ अंतर्गत नोंदणीकृत गटांकडे आपली नोंदणी करावी. शेतकऱ्यांनी त्यांचे नाव, पत्ता, सर्वे नंबर/ गट नंबर, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, त्यांना ज्या कृषि सेवा केंद्रामधुन निविष्ठा खरेदी करावयाच्या आहेत त्यांच्या नावासह त्यांना खरीप हंगामामध्ये आवश्यक असणारे विविध पिकांचे बियाणे, खते, किटकनाशके यांची मागणी आत्मा गटाकडे करावी तसेच शेतकरी व निविष्ठा विक्रेता यामधील आर्थिक बाबी शेतकरी गटामार्फत पारदर्शक पद्धतीने हाताळणी करावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यवतमाळ श्री. नवनाथ कोळपकर यांनी केले.
या उपक्रमाच्या एकत्रीत खरेदी मुळे माल वाहतुक व हमालीचा खर्च वाचेल तसेच कृषि केंद्र धारक मालाचा किफायतशीर भाव लावेल यामुळे शेतकऱ्यांनची फसवनुक होणार नाही व शेतकरी बचत गटाची विश्वासहार्यता वाढेल व गट नव्याने सक्रिय होईल असे विविध फायदे उपविभागीय कृषि अधिकारी पुसद डॉ.प्रशांत नाईक यांनी विषद केले.
शेतकऱ्यांनी त्यांना हव्या असलेल्या आणि वाजवी दरामध्ये निविष्ठांचा पुरवठा करणाऱ्या कृषि निविष्ठा विक्रेत्याकडून खते बियाणे खरेदी करण्यासाठी नोंदणी करावी या वाहतुकीकरता आवश्यक असणारे परवाने कृषि विभागा मार्फत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. संचारबंदी नियमावलीचे काटेकोर पालन करुन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्वांचे असेच सहकार्य लाभल्यास कृषी विभागा मार्फत शेतकऱ्यांना कुठलीच अडचण भासू देणार नाही असे मत तालुका कृषि अधिकारी अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील लोकप्रतिनिधी, तहसीलदार दिग्रस राजेश वजिरे व मंडळ कृषि अधिकारी चंदन कलोसे तसेच प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचा-यांची तसेच शेतकरी गटाचे प्रतिनिधी अध्यक्ष सचिव यांची उपस्थिती होती. यावेळी ५० मे.टन रासायनिक खत २५० बॅग सोयाबिन तसेच तुरीचे बियाणे तालुक्यातील १५ गावामध्ये रवाना करण्यात आले.
या करीता कृषि विभागाचे कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, कृषी मित्र, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक परिश्रम घेत आहे.