ग्रामीण भागात गावठी दारूचा महापूर : संसर्ग जन्य आजारामुळे नागरिकात भीतीचे वातावरण
सर्वाधिक आंबोड्यात दारुभट्या ; काजू पेक्षा दारू महाग
रितेश पुरोहित :9423703831
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ (महागाव) :
कोविड 19 या संसर्गजन्य आजारामुळे आधीच जनतेमध्ये प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे संसर्ग होऊ नये म्हणून शासनाने विविध योजनेच्या माध्यमातून सोशल डिस्टन्स आणि संचार बंदी सारखे धोरण अंगीकारले आहे एकीकडे संसर्ग थोपविण्यासाठी शासन वाटेल ते प्रयत्न करत असताना महागाव तालुक्यात गावठी दारूचा महापूर वाहू लागलेला आहे त्यामुळे कुठेही सोशल डिस्टन्स पाळल्या जात नाही तसेच गावठी दारूच्या सेवनामुळे अनेकांच्या शारीरिक व्याधी वाढलेल्या आहेत परंतु महागाव तालुका पोलीस स्टेशनला याबाबत कोणतेही सोयरसुतक दिसत नाही.
गावठी दारूच्या गाळपावर पोलिसाचे नियंत्रण सुटल्यामुळे तालुक्यामध्ये रोज चाळीस हजार लिटर दारूचे गाळप होत असल्याची माहिती प्रत्येक ठिकाणावरून मिळू लागली आहे विशेष म्हणजे एकाही ठिकाणी महागाव पोलिसांनी धाड टाकून कार्यवाही केल्याचे ऐकिवात नाही. सोशल डिस्टन्स ठेवण्याकरिता व गर्दी जमू नये म्हणून तालुक्यातील देशी देशी दारूचे दुकान बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे या संधीचा फायदा घेत गावठी दारू गाळप करणार्यांनी पोलिसांना हाताशी धरून प्रचंड प्रमाणात गावठी दारूचे गाळप सुरू केले आहे विशेष म्हणजे बहुतांश गावच्या नागरिकांनी तसेच तंटामुक्त अध्यक्ष पोलीस पाटील व ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी यांनी स्थानिक प्रशासनाला वारंवार अवगत केले आहे परंतु स्थानिक पोलिसाचे आर्थिक हितसंबंध गुंतल्यामुळे एकही धाडसी कार्यवाही करण्यात आलेली नाही अंबोडा ग्रामपंचायत चे उपसरपंच हनवंतराव देशमुख यांनी येथील अवैध व्यवसायाची तक्रार थेट जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे परंतु वरिष्ट अधिकार्यांनी अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही त्यामुळे तालुक्यातील गावठी दारू गाळपाला जिल्हा स्तरावरून पाठबळ तर नाही ना अशी शंका उपस्थित केल्या जात आहे.
तालुक्यातील काळी दौ, फुलसावंगी सवना गुंज हिवरा मुडाणा आंबोडा धनोडा पोखरी वाकान कोणदरी काळी टेंभी महागाव अशा कितीतरी ठिकाणी गावठी दारूचे गाळप सुरू आहे अधिकृत दारूचे दुकान बंद असले तरी अनेक ठिकाणी रस्त्यावर तळीरामांनी हैदोस घातलेला आहे अशा तळीरामांची हौस पुरवण्यासाठी गावठी दारू गाळपाचे गुत्ते कारणीभूत ठरू लागले आहे. तालुक्यामध्ये रोज किमान चाळीस हजार लिटर दारू गाळप होत असल्याची माहिती असून त्यामधून लाखो रुपयांची उलाढाल सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे कारण समोर करून या सगळ्या प्रकारावर पांघरून घालू लागले आहे.
महागाव शहरातील पोलिस स्टेशन हाकेच्या अंतरावरच गावठी दारू गाळपाचे धूर निघू लागले आहे महागाव ते करंजखेड रस्त्यावर काही तथाकथित समाज सेवकांनी गावठी दारू गाळपाला अभय दिले आहे पूस नदी,पैनगंगा नदी आणि नाल्यांमधून व काही शेतातील कोठयावरून दारू गाळपाचे गुत्ते सुरु करण्यात आले आहे. संबंधीत बीट जमादार बऱ्याच अंशी याला कारणीभूत ठरू लागले आहे पाकीट संस्कृती रुजवल्या मुळे गावठी दारूचा व्यवसाय करणारे गावातील प्रतिष्ठित नागरिकावर वरचढ होऊ लागले आहे.
सकाळी सहा ते 9 आणि रात्री सहा ते दहा वाजेपर्यंत गावठी दारू गाळपाचे अनेक ठिकाणी गुत्ते लागलेले पाहायला मिळतात अशा गुत्त्यावर प्रचंड गर्दी होऊ लागलेली आहे या गर्दीमधून कोविड 19 या संसर्गजन्य आजाराची लागण होण्याची शक्यता बळावली आहे संसर्गजन्य आजार बळावू नये म्हणून जिल्हाधिकारी स्वतः जिवाचे रान करत असताना महागाव तालुका प्रशासन पोलिस स्टेशनचे अधिकारी दखल घ्यायला तयार नाही संसर्गजन्य आजाराचा धोका गर्दीमुळे बळावण्याची शक्यता वैद्यकीय व्यवसायातून वर्तवली जात आहे. अजूनही वेळ गेलेली नाही जिल्हा प्रशासनाने महागाव पोलिसांच्या भरोशावर विसंबून न राहता तालुक्यातील जनतेच्या आरोग्यासाठी होत असलेल्या गावठी दारू दुकानदाराचे वेळीच मुसक्या आवळणे नितांत गरजेचे झाले आहे अन्यथा लॉक डाऊन चा संचार बंदीचा कोणताही उपयोग होणार नाही अशी साधार भीती सूज्ञ नागरीकातून व्यक्त केली जात आहे.