विधान परिषद निवडणूक प्रक्रिया आजपासून सुरू
नऊ जागेसाठी होणार निवडणूक ; इच्छुकांची मोठी गर्दी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
काही दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असून, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असाच प्रयत्न आहे.
विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीचे पाच, तर भाजपचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात. सत्ताधाऱ्यांनी जोर लावल्यास सहावी जागा निवडून येऊ शकते, पण सध्याच्या परिस्थितीत सत्ताधारी धोका पत्करणार नाहीत, अशी चिन्हे आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारी किंवा शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ११ तारखेपर्यंत आहे.
सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीसाठी चुरस राष्ट्रवादीला दोन जागा मिळणार असून, दोन्ही नवे चेहरे दिले जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेत मावळत्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पुन्हा संधी दिली जाते का, याची उत्सुकता आहे. भाजपमध्ये चार जागांसाठी मोठी स्पर्धा आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नवी दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करून नावे निश्चित करणार आहेत. एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे हे माजी मंत्री भाजपमध्ये इच्छुक आहेत. खडसे यांचे राजकीय पुनर्वसन होते का, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. बावनकुळे यांना संधी दिली जाऊ शकते. काँग्रेसमध्ये एका जागेसाठी अनेक जण इच्छुक आहेत. अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी केली जात आहे यवतमाळ मधून हरिभाऊ राठोड काँग्रेसचे निवृत्त होत असल्याने त्या जागेवर माणिकराव ठाकरे किंवा शिवाजीराव मोघे यांची वर्णी लागते का ?याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
निवृत्त झालेले आमदार : नीलम गोऱ्हे (शिवसेना), पृथ्वीराज देशमुख, अरुण अडसड, स्मिता वाघ (भाजप), किरण पावसकर, हेमंत टकले, आनंद ठाकूर (राष्ट्रवादी), चंद्रकांत रघुवंशी व हरिभाऊ राठोड (काँग्रेस)