वंचित बहुजन आघाडी ‘इंडिया’चे गणित बिघडवणार..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- युती करण्यासंदर्भात भारत राष्ट्र समितीकडून प्रस्ताव आल्यास नक्की विचार करू,असे वंचित बहुजन आघाडीने जाहीर केले आहे. यावर भारत राष्ट्र समितीने युतीचा प्रस्ताव ठेवत वंचितबरोबर मैत्रिचा हात पुढे केला तर प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर केलेली युती तोडणार का, याकडे लक्ष वेधले जात आहे.
वंचितने आगामी काळात अशाप्रकारची भूमिका घेतली तर २०१९ प्रमाणे इंडिया अथवा महाविकास आघाडीचे गणीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बिघडणार का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी यांच्या ‘एमआयएम’ पक्षाशी युती करून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या आघाडीचे गणीत बिघडवले होते. लोकसभा निवडणुकीत १४ टक्यांच्या आसपास मते घेतली होती. तर वंचितने २०१९ मध्ये आघाडीच्या जवळजवळ १५ उमेदवारांना पराभूत करण्यात हातभार लावला होता. सुमारे ५० हजार ते ३ लाख यादरम्यान मते घेऊन वंचितने आघाडीच्या उमेदवारांचे गणीत बिघडवले होते.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात वंचित-एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलिल यांनी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. तर नांदेड, परभणी, सांगली, अकोला, हिंगोली, बुलढाणा, सोलापूर, हातकणंगले, लातूर, गडचिरोली-चिमूर, नाशिक, उस्मानाबाद, यवतमाळ-वाशिम, बीड, रावेर या लोकसभा मतदारसंघात आघाडीच्या उमेदारवारांना पराभूत करण्यात हातभार लावला होता. यात प्रामुख्याने कॉंग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री पराभूत झाले होते. नांदेडमधून अशोक चव्हाण तर सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदेंना वंचितने हिसका दाखवला होता.
वंचित सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाबरोबर युतीत आहे. मविआमधील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांवर वंचितचे प्रकाश आंबेडकर यांचा विशेष राग असल्याचे यापूर्वी वारंवार समोर आले आहे. त्यामुळे वंचितला मविआमध्ये घेण्यास हे दोन्ही पक्ष तयार नव्हते. त्यातच अजित पवार यांनी राष्ट्रवादीला भगदाड पाडून भाजपबरोबर सत्तेत सहभागी होणे पसंत केले आहे. तसेच भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा भागात प्रखर पक्षविस्तार करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे भारत राष्ट्र समितीला भाजपची ‘बी’टीम म्हणून कॉंग्रेसकडून हिणवले जाते. अशा परिस्थितीत भरभक्कम अर्थबळ पाठीशी असणाऱ्या भारत राष्ट्र समितीने वंचितला युती करण्यासाठी एक हात पुढे केला तर उद्धव ठाकरे यांची साथ सोडून वंचित भारत राष्ट्र समितीसोबत राज्यात लोकसभेच्या जागा लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे वंचित पुन्हा २०१९ प्रमाणे २०२४ मध्ये भारत राष्ट्र समितीच्या सोबत एकत्र येऊन मविआच्या उमेदवारांच्या मतांमध्ये विभाजन करण्याची भीती महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटू लागली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..