“फक्त फोडू नका बांधायला देखील शिका..!”, भाजपने केलं अमित ठाकरेंना टार्गेट..?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या नाशिक-नगर दौऱ्यादरम्यान मोठा राडा झाला होता. सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोल नाका मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमित ठाकरे यांची गाडी अडवली होती म्हणुन फोडला होता.
टोल नाक्यावर अमित ठाकरे यांचा अपमान झाला, म्हणून टोल नाका फोडला असं मनसे कार्यकर्त्यांच म्हणण होतं. सिन्नर टोल नाक्यावर अमित ठाकरे यांना अर्धातास थांबवल्याचा आरोप करण्यात आला होता. मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावर हल्लाबोल केला होता.
दरम्यान मनसैनिकांनी केलेल्या या तोडफोडीवर आता भाजपाने ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी यासंबधीचा एक एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये भाजपाने थेट अमित ठाकरे यांना टार्गेट केलं आहे.
भाजपने काय म्हंटलं आहे ट्विटमध्ये?
“अमित ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा” असा खोचक टोला भाजपाने लगावला आहे. भाजपाने एक व्हिडिओ पोस्ट करुन अमित ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
भाजपाने व्हिडिओमधून अमित ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. फास्ट टॅगची समस्या असल्यामुळे अमित ठाकरे यांची गाडी फक्त तीन ते साडेतीन मिनिटं थांबवली असंही भाजपाने म्हंटलं आहे. टोल नाका फोडल्याचं समजल्यानंतर अमित ठाकरे यांच्या चेहऱ्यावर असुरी आनंद दिसला असं देखील भाजपाने म्हंटलं आहे. त्यांनी अमित ठाकरे यांच्यावर खोट बोलण्याचाही आरोप यावेळी केला आहे. अमित ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना टोल नाका फोडायला भाग पाडलं, असं देखील व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
अमित ठाकरे यांची प्रतिक्रिया?
टोलनाक्यावरच्या कर्मचाऱ्यांची उद्धट भाषा होती. फास्टटॅग असूनही गाडी बराचवेळ थांबवली. टोलनाक्याची टेक्निकल अडचण होती. मॅनेजरसह कर्मचाऱ्याची भाषा उद्धटपणाची होती, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर मला नाशिकला पोहचल्यावर कळलं, की टोलनाका फोडला. राज ठाकरेंमुळे अनेक टोलनाके बंद झाले. माझ्यामुळे आणखी एक वाढला, असं अमित ठाकरे म्हणाले.
भाजपाला मुजोर टोल कंत्रादाराची दलाली करायची आहे का?- संदीप देशपांडे
भाजपाच्या या व्हिडिओला मनसेनेही प्रत्युत्तर दिल्याचं दिसुन येत आहे. ‘मणिपूर मधील घटनेबद्दल थोबाड बंद ठेवणाऱ्या भाजपाला मुजोर टोल कंत्रादाराची दलाली करायची आहे का?’, असा रोखठोक प्रश्न संदीप देशपांडे यांनी भाजपला केला आहे.