विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीसंदर्भात शरद पवारांची महत्वपूर्ण माहिती; ही बैठक शिमल्याऐवजी ‘या’ शहरात होणार….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक आता शिमल्याऐवजी कर्नाटकातील बंगळरू येथे होणार आहे. कारण शिमल्यात प्रचंड पाऊस पडत असून त्यामुळे ही बैठक बंगळरूमध्ये १३ आणि १४ जुलै अशी दोन दिवस घेण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिली.
देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांची एक बैठक बिहारची राजधानी पाटणा येथे २३ जून रोजी झाली होती. त्यावेळीच पुढची बैठक शिमला येथे होणार असल्याची माहिती बैठकीला उपस्थित असलेले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी दिली होती. त्या पाटण्यातील बैठकीला देशभरातील सुमारे १६ पक्षाचे प्रमुख उपस्थित होते.
भाजपला रोखण्यासाठी देशभरातील विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्ठीने रणनीती ठरविण्यासाठी या विरोधी पक्षाच्या नेत्यांची पहिली बैठक पाटणा येथे झाली होती. त्यासाठी बिहाराचे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांनी पुढाकार घेतला होता. आता पुढील बैठक ही काँग्रेसशासीत राज्यात होणार आहे, त्यामुळे हिमाचल प्रदेशमधील शिमला या ठिकाणची निवड करण्यात आली होती. दरम्यान, शिमल्यात अतिवृष्टी सुरू असल्यामुळे विरोधी पक्षाच्या बैठकीचे स्थान बदलण्यात आलेले आहे.
यासंदर्भात शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, विरोधी पक्षाच्या नेत्यांची पाटण्यात बैठक झाली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेत होते. त्याची माहिती समजल्यानंतर त्यांच्यामध्ये अस्वस्थता वाढलेली दिसत आहे, त्यामुळे त्यांनी व्यक्तीगत हल्ले करायला सुरुवात केलेली दिसत आहे. विरोधी पक्षाच्या बैठकीला त्यांनी ‘फोटोसेशन हेाते’, असे सांगितले.
पाटण्यातील बैठकीनंतर आम्ही दुसरी बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही दुसरी बैठक १३ आणि १४ जुलै रोजी बंगळरू (Bengalore) या ठिकाणी होणार आहे. ही बैठक शिमल्यात ठरली होती. पण, सध्या त्या ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे जागा बदलण्याचा निर्णय आजच घेतला. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांची दुसरी बैठक ही शिमल्याऐवजी बंगळरू येथे होणार आहे. ती बैठक १३ जुलैला सुरू होईल आणि १४ जुलै रोजी संपेल. म्हणजे ती दोन दिवस चालणार आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.