भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांच्यावर जीवघेणा हल्ला…! गोळीबारात जखमी…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सहारनपूर :- भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेख आझाद यांच्यावर काही अज्ञात लोकांनी जीवघेणा हल्ला केल्याचं वृत्त आहे. काही लोकांनी केलेल्या गोळीबारात गोळी आझाद यांच्या कंबरेला घासून गेल्यानं ते थोडक्यात बचावले असून किरकोळ जखमी झाले आहेत.
भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टीचे प्रमुख असलेल्या चंद्रशेखर आझाद यांच्यावर काही अज्ञात लोकांनी गोळीबार केला. उत्तर प्रदेशातील सहारनपूर इथं बुधवारी संध्याकाळी हा हल्ला झाला असून कारमधून आलेल्या काही लोकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
आझाद यांनी सांगितला घटनाक्रम
या हल्ल्याबाबत स्वतः आझाद यांनी माहिती देताना सांगितलं की, “मला लक्षात नाही पण आमच्या लोकांनी त्यांना ओळखलं आहे. त्यांची गाडी पुढे सहारनपूरच्या दिशेनं गेली, आम्ही यूटर्न घेतला. आमची गाडी एकटीच होती, यामध्ये एकूण पाच लोक होते. आमच्या सहकारी डॉक्टरांना देखील गोळी लागली आहे”
कोण आहेत चंद्रशेखर आझाद?
चंद्रशेखर आझाद रावण अशा नावानंही ते ओळखले जातात. न्यायासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणारा धडाडीचा आंबेडकरवादी नेता म्हणून उत्तर प्रदेशसह देशभरात त्यांची ओळख आहे. आझाद यांचा जन्म उत्तर प्रदेशातील सहारनपुर येथील छुतमलपूर गावात झाला. त्यांचे वडील गोवर्धनदास हे एका सरकारी शाळेतील सेवानिवृत्त प्रिन्सिपल होते. स्वतःला आझाद यांनी दलित आयकॉन म्हणून प्रस्थापित केलं आहे. आक्रमक भाषण आणि आंदोलनासाठी ते ओळखले जातात.
सन २०१४ मध्ये त्यांनी सतीश कुमार आणि विनय रतन सिंह यांच्यासोबत ‘भीम आर्मी’ या संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या महाराष्ट्रासह देशभरात शाखा आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशात या संघटनेमार्फत ते दलितांसाठी मोफत शाळा चालवतात. सन २०१९ मध्ये चंद्रशेखर आझाद यांनी वाराणसी येथून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.
पण नंतर सपा-बसपा युतीला पाठिंबा देत माघारही घेतली होती. त्यानंतर १५ मार्च २०२० रोजी बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम यांच्या ८६ व्या जयंतीदिनी त्यांनी आझाद समाज पार्टी नावानं राजकीय पक्षाची स्थापना केली. हाथरस रेप केस, कृषी कायदे आणि दिल्लीतील रविदास यांचं जुनं मंदिर हटवण्याच्या प्रकरणात त्यांनी मोठा लढा उभारला होता. ज्याची खूपच चर्चाही झाली होती.